मुंबई - 'ख्वाडा' आणि 'बबन'च्या यशानंतर भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचा नवीन चित्रपट येऊ घातलाय तो म्हणजे 'टीडीएम'. अनोख्या नावाच्या या चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली असून त्याचा लवकरच होणार लूक रिव्हील होणार आहे. आगळावेगळा विषय हाताळणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित, ‘टीडीएम’ची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे.
चित्रपटाचा संभ्रमात पाडणारे पोस्टर प्रदर्शित झाले असून चित्रपटात नेमकं कोण मुख्य भूमिकेत दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले. लवकरच याचा उलगडाही होणार आहे. ग्रामीण, वास्तविक जीवनातील समस्येवर सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करणारे भाऊराव कऱ्हाडे 'ख्वाडा' आणि 'बबन' चित्रपटाच्या यशानंतर कॉमेडी जॉनर घेऊन आले आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबत निर्मिती अशी दुहेरी धुरा त्यांनी सांभाळली आहे.
भाऊराव खराडेंच्या आतापर्यंतच्या सर्वच चित्रपटांची शीर्षक वेगळी राहिली आहे. टीडीएम ही अक्षरे इंग्रजी असली तर एक अस्सल मराठमोळा विषय घेऊन यानिमित्ताने भाऊराव सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये डोक्यावर अंडरवेअर, हातात मागे ताणलेले टॉवेल आणि गाव तळ्याजवळ महिंद्र ट्रॅक्टरसह उभा राहिलेला तरुण दिसतो. एका ट्रॅक्टर ड्रायव्हरची गोष्ट यात पाहायला मिळणार असे दिसते. या चित्रपटाचे नाव टीडीएम म्हणजेच ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा असे असावा असा जाणकार तर्क लावत आहेत. या चित्रपटातून एक रांगड्या गड्याची कथा मांडण्यात आली आहे. या चित्रपटाचा एक टीझर काही दिवसापूर्वी रिलीज करण्यात आला होता. यामध्ये एका ओसाड माळरानात विहिर खोदण्याचे काम सुरू असलेले दिसते. विहिरीच्या खड्यात सुरुंग पेरण्यासाठी ड्रील मशीन हाताळणारा तरुण दिसतो आणि नंतर त्या जागेवर मोठा स्फोट होतो. यावरुन अस्सल मातीतील कथा या चित्रपटात आहे हे मात्र निश्चित.