मुंबई - शिवकालीन चित्रपटांची मागणी वाढताना दिसत असून त्या काळातील असंख्य कथा लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत. त्यामुळेच इतिहासाच्या कानाकोपऱ्यात लपलेल्या कथा सध्या प्रेक्षकांसमोर आणण्याचे काम काही निर्माते करताना दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता स्वराज्य स्थापनेत मोलाचा वाटा उचलला. स्वराज्याची पायाभरणी करणाऱ्या अनेक शिलेदारांच्या यशोगाथा विस्मृतीत गेल्या. शिवकालीन इतिहासातील तीच पाने आता मोठ्या पडद्यावर रंजक स्वरूपात माडण्यात येत असून असंख्य मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर अजरामर कर्तुत्व दाखवून दिलं ते प्रेक्षकांसमोर ठेवण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांशी निष्ठा व स्वराज्य रक्षणाची जबाबदारी उचलणाऱ्या मावळ्यांची यशोगाथा समोर येत असताना आता 'सुभेदार' या चित्रपटातून सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गोष्ट दिसणार आहे. स्वराज्यासाठीची तळमळ आणि स्वतःच्या आधी महाराजांना ठेवणारे सुभेदार आणि त्यांचे वाक्य, 'आधी लगीन कोंढाण्याच आन मग माझ्या रायबाच' अजरामर झालेलं आहे. 'सुभेदार‘ हे मुलकी आणि लष्करी असे दोन्ही प्रकारांत महत्त्वाचे पद होते. या लढावैय्याच्या पराक्रमाने आणि नेत्रदीपक कर्तृत्वाने शिवकालीन इतिहासाची पाने भरून निघालेली आहेत. स्वराज्यासाठी तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या या सुभेदाराची कहाणी त्याच नावाच्या चित्रपटातून समोर येत आहे. नुकताच याचा टिझर प्रदर्शित करण्यात आला.
तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित हिंदीमध्ये तान्हाजी नावाचा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट खूप चाललाही होता. आता तान्हाजी मालुसरे यांचा चरित्रपट मराठीमध्ये येऊ घातला असून वरील त्यात आजपर्यंत लोकांसमोर न आलेल्या गोष्टींवर भर देण्यात आला आहे. शिवछत्रपतींच्या योद्ध्यांपैकी,
सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे, हे एक महत्त्वाचे नाव. सिंहगडाची लढाई ही त्यांची मोठी ओळख असली तरी त्यांनी शिवछत्रपतींच्या छत्राखाली अनेक महत्वाच्या कामगिरी केल्या आहेत.
'सुभेदार’ हे शिवराज अष्टकातील, फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज नंतरचे पाचवे चित्रपुष्प, जे घेऊन आले आहेत लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर. याची निर्मिती केली आहे राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन या बॅनर्स खाली तर निर्माते आहेत पेंढारकर, अनिल वरखडे,दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर,श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड. याची प्रस्तुती आहे ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची. शिवराज अष्टकातील भव्य ऐतिहासिक चित्रपट ‘सुभेदार’ येत्या २५ ऑगस्ट २०२३ ला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.