मुंबई- अक्षय कुमारचा सेल्फी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला आहे. त्यामुळे त्याचा हा सलग पाचवा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आहे. यामुळे अनेकांनी अक्षयलाच जबाबदार धरले आहे. मुंबईतील गॅलक्सी चित्रपटगृहाचे मालक मनोज देसाई यांनी अक्षय कुमारला चांगलेच झापले आहे.
गॅलक्सीचे मालक मनोज देसाई यांनी अक्षय कुमारला वारंवार कपिल शर्मा शोमध्ये उपस्थित राहात असल्यामुळे झापले आहे. मनोज देसाई म्हणाले, 'माझ्या अनेक मित्रांनी आणि प्रेक्षकांनी म्हटलंय की हा अक्षय कुमार वारंवार कपिल शर्मा शोमध्ये जातो, त्याला हे शोभून दिसतं का? मी हा प्रश्न तुम्हाला विचारतो, तुम्हाला हे शोभून दिसत का? कपिलने मला तीन वेळा बोलवलं, मी एकदाही गेलो नाही. कारण तो कधी तुमचे कौतुक करतो तर कधी तुमचा कचरा करतो. हे तुम्हाला शोभून दिसतं? कमाल करतोयस अक्षय, काय झालंय तुला, मी तुझा फॅन आहे, मी तुला हात जोडून सलाम करतो. पूर्वी तुझे एक एक चित्रपट काय होते, जगाची हवा टाईट करुन सोडली होतीस तू. आता काय झालंय तुला..' देसाई यांनी अक्षय कुमारला कपिल शर्मा शो हा सलमान खानचा असल्याची आठवणही करुन दिला. त्या शोमध्ये तुझी गुंतवणूक तर नाही ना, असेही त्यांनी अक्षयला विचारले.