मुंबई - अॅटली दिग्दर्शित शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. रेड चिलीज एन्टरटेन्मेंटच्या सोशल मीडियावर हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर पाहता क्षणीच चाहते प्रेमात पडल्याचे दिसत असून शाहरुखचा हा नवा अवतार प्रेक्षकांना भुरळ पाडणारा आहे.
'एका राजा होता जो एका पाठोपाठ एक युद्ध हारत गेला. भुकेने आणि तहानेने जंगलात भटकत होता. खूप रागात चालला होता', अशा प्रकारच्या निवेदानाने ट्रेलर सुरू होतो आणि बंदुकीच्या ट्रीगरवर बोट ठेवलेला शाहरुख खान दिसतो. एका अनोख्या अवतारातील किंग खानचे दर्शन या ट्रेलरमध्ये आपल्याला दिसू लागते. 'पठाण' चित्रपटातून पुन्हा निर्माण केलेली अॅक्शन हिरोची प्रतिमा 'जवान'मध्ये आणखी उजळण्यात चित्रपट यशस्वी झाल्याचे ट्रेलरमध्ये दिसते.
'जवान' चित्रपटाच्या ट्रेलरमधून एकेक पात्रांचाही परिचय प्रेक्षकांना होता. शाहरुख खान हायजॅक केलेल्या ट्रेनमध्ये व्हिलनच्या अवतारात दिसतो तर विजय सेतुपती हा कालीच्या अवतारातील एक खतरनाक व्हिलेन असल्याचे दिसते. तो आपला परिचय जगातील सर्वश्रेष्ठ शस्त्रास्त्र डिलकर पैकी एक असल्याचे करुन देतो. एका प्रसंगात दीपिका पदुकोणही दिसते. तिचा आणि शाहरुखचा रोमँटिक अॅक्शन सीक्वेन्स जबरदस्त जुळून आलाय.
संकटाच्या प्रसंगात आपला जीव हजार वेळा धोक्यात घालण्याची तयारी असलेल्या 'जवान'च्या रुपात ट्रेलरच्या उत्तरार्धात शाहरुख खान दिसतो. देश विरोधी कारवाया करणाऱ्यांविरुद्ध उभा ठाकलेला 'जवान' शाहरुखने साकारला आहे. भरपूर टाळ्या आणि शिट्ट्या यांचा माहोल तयार होऊ शकतील असे जबरदस्त डायलॉग शाहरुखच्या तोंडी असलेले पाहायला मिळतात.