महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

poster of Dha Lekacha : ‘ढ लेकाचा’ पोहोचला पंढरपुरात विठ्ठलाच्या दारी! - poster of Dha Lekacha

सध्या वारीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने पंढरपूरात पांडूरंगाच्या दर्शनासाठी भाविक येत आहेत. आता यात चित्रपट निर्माते आणि कलाकारांचीही भर पडत आहे. ढ लेकाचा या चित्रपटाचे पोस्टर पंढरपूरात रिलीज करण्यात आले.

Etv Bharat
‘ढ लेकाचा’ पोहोचला पंढरपुरात विठ्ठलाच्या दारी!

By

Published : Jun 23, 2023, 8:06 PM IST

मुंबई - दरवर्षी विठ्ठलाच्या वारीसाठी अनेकजण आतुर असतात. सध्या आषाढी वारीचं मंगलमय वातावरण असताना चित्रपटसृष्टीतील अनेक निर्माते, कलाकार विठुरायाच्या आराधनेत तल्लीन होताना दिसताहेत. तसं बघायला गेलं की जवळपास सर्वभाषिक चित्रपटसृष्टींतील जवळपास सगळेच एका चमत्काराच्या प्रतीक्षेत असतात. स्वतःच्या कामाबद्दल कितीही आत्मविश्वास असला तरीही देवाच्या दारी ते यशासाठी प्रार्थना करीत असतात. अंधश्रद्धा नाही असे कितीही म्हटले तरी चित्रपट प्रदर्शनावेळी देवाची आठवण येते आणि जो तो आपापल्या देवाला साकडं घालताना दिसतो. नवीन मराठी चित्रपट ‘ढ लेकाचा’ ची टीम नुकतीच विठूरायासाठी दारी पोहोचली. भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या विठ्ठलाचा स्थायीभाव सर्वश्रुत आहे. अगदी त्याचप्रमाणे ‘ढ लेकाचा’ मधील भाल्या सर्वांच्या मदतीला धावून जाणारा असून त्यामुळे स्वतःवर कितीही संकटे आली तरी ती हसून झेलण्याची ताकद त्याच्याअंगी आहे. या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शनाचा सोहळा पंढरपुरात संपन्न झाला.

ढ लेकाचा या चित्रपटाचे पोस्टर पंढरपूरात रिलीज


सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या विठ्ठलाची महिमा अपरंपार आहे.त्यामुळेच या सिनेमाचं पोस्टर विठ्ठलाच्या मंदिरात प्रदर्शित करण्यात आले. ह्यावेळी चित्रपटातील प्रमुख कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. चित्रपटाचे नाव लक्षवेधक असून त्याच्या पोस्टरवरील लहान मुलाचे भाव त्याच्या निरागसतेविषयी खूप काही बोलून जातात. विठ्ठलाचे नामस्मरण करीत आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी या चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक हा चित्रपट म्हणजे विठुरायाच्या प्रसाद समजून त्याला पाठिंबा देतील अशी आशा निर्माते व्यक्त करतात. महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांसाठी 'ढ लेकाचा' हा चित्रपट अल्ट्रा झकास या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. सध्या डिजिटल माध्यमांवर चित्रपट प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्या वाढतच आहे. हिंदीबरोबरच इतर भाषिक, ज्यात मराठीसुद्धा आहे, चित्रपट ओटीटीला प्राधान्य देताना दिसताहेत.

ढ लेकाचा या चित्रपटाचे पोस्टर पंढरपूरात रिलीज


'ढ लेकाचा' या चित्रपटातील भाल्या हे प्रमुख पात्र असून त्याच्याभोवती कथानक गुंफलं गेलं आहे. त्याच्या शाळेत विक्की देशमुख हे बड्या बापाचं धेंड आहे. आपल्या बापाच्या पैशांचा त्याला माज असून तो सतत भाल्याला त्रास देत राहतो. त्याच्या दांडगट दडपशाहीला भाल्याला सतत तोंड द्यावे लागते कारण विक्की शाळेतील शिक्षणप्रणालीवर देखील प्रभुत्व गाजवत असतो. भाल्याला जीवनातील संघर्षाबरोबरच शालेय जीवनात संघर्ष करावा लागतो. भाल्याचे वडील, सदा लोहार, आणि भाल्या यांच्यातील नाते अत्यंत गोड असून ते त्याला परिस्थितीशी मुकाबला करायला शिकवीत असतात. त्यातच त्यांच्याकडे एक बकरी असून त्यांच्यातही भावनिक नातं आहे. भाल्या सर्व अडचणींवर कसा मात करतो याचे प्रेरणादायक चित्रण चित्रपटातून करण्यात आले आहे.



दिग्दर्शक जोगेश्वर ढोबळे यांनी ढ लेकाचा चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात बाल कलाकार आयुष उलागड्डे याची प्रमुख भूमिका असून सोबत अतुल महेल, मुकुंद वसुले यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘ढ लेकाचा’ येत्या २६ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details