मुंबई - चित्रपट क्षेत्रात आता प्रादेशिक चित्रपट जास्त प्रसिध्दी मिळविताना दिसताहेत. चित्रपट हा भाषेच्या अडसरीशिवाय अनेक भाषिक लोकांचे मनोरंजन करू लागलाय. भाषेच्या मर्यादा ओलांडून मनोरंजन पॅन इंडिया होऊ लागलाय. अनेक सिनेमे एकाधिक भाषांमध्ये प्रदर्शित होऊ लागलेत. त्यामुळे त्या प्रत्येक सिनेमाची पोच वाढली आहे. आता झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत आणि हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' हा मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होतोय. तो मराठी, हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषेतही प्रदर्शित होणार आहे.गेल्या आठवड्यात या चित्रपटातील 'गुन गुन' हे मराठी गाणे प्रदर्शित केले गेले. महत्त्वाचं म्हणजे त्या गाण्याच्या तेलुगू, तामिळ मधील प्रतीही प्रदर्शित करण्यात आल्या. तेलुगु आणि तमिळ भाषेतील या गाण्याला त्या भाषेतील रसिकंनी उदंड प्रतिसाद दिल्याचे व्यूव्ह्ज वरुन दिसत आहे.
झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत जंगल अवताडे यांनी केलं आहे. या चित्रपटातील 'गुन गुन' या हळुवार प्रेम फुलवणाऱ्या गाण्याने संगीत प्रेमींना प्रफुल्लित केले. समाज माध्यमांवर या ३० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून त्याची संख्या वाढतच आहे. या गाण्याने प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शनाआधीच आपलंस केलं आहे. अनेक प्रेमी युगुलं आपल्या प्री वेडिंग शूटसाठीही या गाण्याचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. मराठीत या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असताना या गाण्याच्या तेलुगू आणि तामिळ भाषेतील प्रतींनाही चांगला प्रतिसाद मिळतोय.