मुंबई- मराठी चित्रपटाने पुन्हा एकदा कात टाकली असून अनेक विषयांची निर्मिती सुरू केली आहे. गेल्या काही वर्षात ऐतिहासिक विषयांना प्रेक्षक प्रतिसाद देत असल्यामुळे या विषयावरील अनेक कथा सिनेमातून आल्या. त्यासोबतच राजकीय आणि सामाजिक विषयावरील चित्रपटांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे हे लक्षात घेऊन आता चौक या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
मराठी चित्रपटाची गुढी - नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील सिटी प्राईड या कोथरूडमधील थिएटरच्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटाची गुढी उभारण्यात आली. याप्रसंगी मराठी चित्रपटासंबंधित सर्व मान्यवर आणि कलाकार जातीने हजर होते. यावेळी दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड यांचा आगामी मराठी चित्रपट ‘चौक’च्या रिलीजची तारीखही जाहीर करण्यात आली. १२ मे २०२३ रोजी चौक महाराष्ट्रभर रिलीज केला जाणार आहे.
देवेंद्र गायकवाड यांचे पदार्पण- ‘चौक’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने देवेंद्र गायकवाड दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. महाराष्ट्रातल्या चौका-चौकाची गोष्ट ते या चित्रपटातून आपल्यासमोर मांडणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रसिध्द करण्यात आले होते. सोशल मीडियावर या पोस्टरने धुमाकूळ केला. आता या चित्रपटाची रिलीज तारीख जाहीर झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक ताणली आहे.