मुंबई - मराठी सिनेसृष्टी भारतातील अग्रगण्य समजली जाते. आशयपूर्ण सिनेमा बनवणे ही त्याची खरी ओळख. तांत्रिक अंगानेही मराठी सिनेमा प्रगत बनलाय. मुळात भारतीय सिनेसृष्टीचा पायाच मराठी माणसाने घातलाय हे आपण जाणतो. दादासाहेब फाळके हे भारतीय सिनेमाचे जनक आहेत. त्यानंतर कलामहर्षि बाबूराव पेंटर यांनीही फाळकेंच्या समकालात जोरदार सिनेमांची निर्मिती सुरू ठेवली होती. त्यांच्याच महाराष्ट्र फिल्म कंपनीत व्ही शांताराम या सृजनशील दिग्दर्शकाची जडण घडण घडली आणि मराठीतील पहिला बोलपट बनवण्याची कमाल शांताराम यांनी करुन दाखवली. ६ फेब्रुवारी १९३२ या दिवशी चित्रपट महर्षी व्ही शांताराम दिग्दर्शित अयोध्येचा राजा हा सिनेमा मुंबईत प्रदर्शित झाला होता.
दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा चित्रपट १०१३ मध्ये बनवला होता. मात्र हा मुकपट होता. त्यानंतर १९ वर्षांनी चित्रपटातील पात्रांना आवाज मिळाला आणि १९३१ मध्ये आलाम आरा हा पहिला बोलपट बनला. त्यानंतर वर्षभरातच १९३२ मध्ये पहिला बोलपट आयोध्येचा राजा व्ही. शांताराम यांनी बनवला होता.
‘अयोध्येचा राजा’ या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका केल्या होत्या. आजही हा सिनेमा सिनेसृष्टीतला मैलाचा दगड मानला जातो कारण मराठी सिनेमा बोलू लागला तो याच चित्रपटामुळे.