मुंबई- प्रेमाला वयाचं बंधन नसतं. प्रत्येकाच्या हृदयाच्या कोपऱ्यात प्रेमाच्या आठवणी बंदिस्त असतात. त्या बाहेर आल्या की जीवनातील काही क्षण सुगंधी होतात. आठवणींना पंख फुटतात आणि ते मनुष्याला भूतकाळाची सैर करून आणतात. अशाच आठवणींचा फड रचला आहे दिग्दर्शक सिद्धांत अशोक सावंत यांनी, त्यांच्या पहिल्या वहिल्या 'आठवणी' या चित्रपटातून. त्यांनी दोन पिढ्यांच्या अनोख्या प्रेमकथेची गोष्ट पत्रावाटे उलगडून दाखवली आहे. आजची तरूणाई आणि वयस्कर यांना हा चित्रपट आपलासा वाटेल कारण यात दोन्ही पिढ्यांचे प्रतिनिधित्व केले गेले आहे.
आठवणीत रमून जाण्याची मजा काही औरच असते. एक लेखक कथेच्या शोधात निघालेला असून काहीही सुचत नसताना अनवधानाने सापडलेले एक पत्र त्याची झोप उडविते. कारण त्यातून साकारली गेली असते एक प्रेमकथा, भूतकाळातील एक भावनिक प्रेमकथा. आठवणींच्या शिदोरीतून उलगडणारी आगळी वेगळी प्रेमकथा, जी भावनिक गुंतागुंत आणि ओढ याने भारलेली आहे. आणि ती प्रेमकथा म्हणजे 'आठवणी' हा चित्रपट. काही दिवसांपूर्वी याचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते आणि आता त्याचे ट्रेलर अनावरीत करण्यात आले आहे.
आठवणी या चित्रपटाचे पोस्टर राजकारणी आमदार अजितदादा पवार आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री व आमदार जयंतराव पाटील आणि आमदार दिलीप वळसे-पाटील हे देखील उपस्थित होते. चित्रपटाच्या पोस्टरवर ज्येष्ठ कलाकार मोहन आगाशे आणि सुहास जोशी पाहून त्यांनी चित्रपट नक्कीच चांगला असणार असे भवितव्य केले. पोस्टरवर सुहृद वार्डेकर आणि वैष्णवी करमरकर हेदेखील दिसत आहेत. याशिवाय अभिनेता निनाद सावंत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसेल. ट्रेलर वरून समजते की चित्रपटातील पत्रातून होणारा संवाद यातून कथानक पुढे सरकते.