कोची - लोकप्रिय मल्याळम अभिनेत्री, टेलिव्हिजन अँकर आणि स्टेज शो परफॉर्मर, सुबी सुरेश यांचे बुधवारी कोची येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कुटुंबीयांनी दिल्यानंतर टीव्ही जगतासह प्रेक्षकांच्यातही शोककळा पसरली. गेल्या काही दिवसापासून सुबी सुरेश यांना यकृताशी संबंधित आजार होता. यासाठी त्यांच्यावर उपचारही सुरू होते. वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी या गुणी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला.
स्टेज शोमध्ये उत्सफुर्त बोलण्याबद्दल सुबी सुरेश यांना ओळखले जात असे. टीव्ही आणि चित्रपट तारे तारकांइतकेच सुबी यांचे फॅन फॉलोइंग होते. काही वर्षापूर्वी सुबी यांनी मिमिक्री कलाकार म्हणून करियरला सुरुवात केली होती. एक महिला मिमिक्री आर्टिस्ट म्हणून त्या अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या. हीच लोकप्रियता त्यांना लवकरच स्टेज शोची उत्तम सूत्रसंचालिका घडवण्यात मैलाचा दगड ठरली. तिने हळूहळू स्टेज आणि टेलिव्हिजनवरील पुरुष-प्रधान कॉमेडी शोमध्ये स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले.
अल्पावधीतच, विविध टीव्ही वाहिन्यांद्वारे आयोजित केलेल्या थेट प्रक्षेपणाच्या कार्यक्रमात सुबी सुरेश हे नाव सतत झळकू लागले. तिचा आनंदी आणि उत्साही चेहरा भल्या भल्यांना बोलते करत होता आणि मिश्कील वाणीतून थेट लोकांच्या मनापर्यंत उलगडत होता. त्यांनी तमाम प्रेक्षकांची मने जिंकली होती. टीव्ही वाहिनीवरील सर्वाधित लोकप्रिय अँकर बनण्याचे भाग्या त्यांना लाहले होते. अर्थातच एक जबरदस्त टॅलेंट असल्यामुळेच हे शक्य होऊ शकले.