मुंबई - Suhana Khan singing debut : सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, झोया अख्तर दिग्दर्शन करत असलेल्या 'द आर्चीज' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटात सुहाना अभिनय तर करतच आहे, पण तिने या चित्रपटासाठी 'जब तुम ना थीं' या गाण्याचं गायनही करुन चाहत्यांना थक्क केलंय. अशा प्रकारे सुहानानं गायनातही पदार्पण केलंय हे सोमवारी स्पष्ट झालं.
इंस्टाग्रामवर सुहानानं एक पोस्ट शेअर केली. याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं "मी माझे पहिले गाणे गायले आहे! झोया अख्तर आणि शंकर महादेवन यांनी माझ्याबद्दल इतका संयम बाळगल्याबद्दल धन्यवाद. कृपया गाणं ऐका." तिने पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच तिच्या मित्रांनी आणि चाहत्यांनी रेड हार्ट्स आणि फायर इमोटिकॉन्ससह कमेंट सेक्शनमध्ये कौतुकाचा वर्षाव केला. अभिनेत्री शनाया कपूर आणि अनन्या पांडेनंही सुहानाचं भरपूर कौतुक केलं. दिग्दर्शक झोया अख्तरनेही ‘सुहाना शाइन ऑन’ अशी प्रतिक्रिया दिली.
'जब तुम ना थीं' हे गाणं मंत्रमुग्ध करणार आहे. या गाण्याचा ऑडिओ रिलीज करण्यात आलाय. हे गाणं श्रवणीय झालं असल्याचं ऐकताना लक्षात येतं. या गाण्याला शंकर महादेवन यांनी संगीतबद्ध केलंय. या गाण्याला सुहाना खान आणि डॉटनं आवाज दिलाय. जावेद अख्तर यांनी लिहिलेलं गाणं चित्रपटात अगस्त्य नंदा, खुशी कपूर, मिहीर अहुजा, वेदांग रैना आणि सुहाना खान यांच्यावर चित्रीत करण्यात आलंय.
झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज' चित्रपटातून अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदा, शाहरुक खानची मुलगी सुहाना खान आणि निर्माता बोनी कपूर यांची खुशी कपूर यांच्या अभिनयात पदार्पण करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारे प्रमोशन सुरू आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील इतर गाणीही उत्तम झाली आहेत.