मुंबई - तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डे यांचा मन कस्तुरी रे चित्रपटाचा ट्रेलर काल रिलीज झाला. यासाठी खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी एका रॅाक कॅान्सर्टद्वारे ‘नाद’ गाण्याचे जोरदार लाँचिंग झाले होते. सोशल मीडियावर या गाण्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘मन कस्तुरी रे’ (Mann Kasturi Re) चित्रपटाचा ट्रेलर लाँचवेळी अभिनय बेर्डे (Abhinay Berde) आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) यांनी स्कुटीवरून धमाकेदार एन्ट्री केली. या सोहळ्याला अभिनय आणि तेजस्वीसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
अभिनय बेर्डेने मन कस्तुरी रे चित्रपटाचा ट्रेलर लॉन्चिंगच्या प्रसंगीच पहिल्यांदा पाहिला. यावर बोलताना तो म्हणाला,'' पहिल्यांदाच माझा ट्रेलर पाहताना माझे काम मला आवडले. ट्रेलर आवडला, अप्रतिम एडिट झालाय. ''
यावेळी तेजस्वी प्रकाश भारावून गेली होती. टीव्ही जगतात मोठे नाव कमवलेली तेजस्वी मन कस्तुरे चित्रपटातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. याबद्दल बोलताना ती म्हणाली, ''आयुष्यात मी पहिल्यांदा मोठ्या स्क्रिनवर पाहिलं आहे. हे खूपच भारावून टाकणारं होतं. मी छोट्या स्क्रिनवर पाहिलं होतं तेव्हा मला इतकं भारी वाटलं नव्हतं. पण इतक्या मोठ्या स्क्रिनवर स्वतःला पाहून बरं वाटलं. मला खूप भारी वाटतंय. अशा सुंदर टीमसोबत मी माझा पहिला अनुभव शेअर करतेयं. माझ्यासारख्या नवोदित अभिनेत्रीवर इतका मोठा विश्वास ठेवला त्याबद्दल दिग्दर्शक आणि टीमचे मनापासून आभार.''
मन कस्तुरे ट्रेलर कसा आहे?- सर्वसामान्य घरातून आलेल्या प्रत्येक मुलाची काही स्वप्ने असतात. स्वतःचे घर, एक चांगली नोकरी, आईच् चेहऱ्यावरील हास्य. असंच स्वप्न घेऊन जगणाऱ्या सिद्धांतचं त्याच्या आईवर जीवापाड प्रेम आहे. कॅालेजमध्ये शिक्षण घेत, घरखर्चासाठी नोकरी करून सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या सिद्धांतच्या आयुष्यात श्रुती येते. त्याचे पूर्ण आयुष्यच बदलते. श्रुती आणि सिद्धांत एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. मग असे काय होते की, ज्यामुळे त्या दोघांच्या प्रेमाला नजर लागते. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भरपूर सस्पेन्स आणि ट्विस्ट पाहायला मिळत असून एकमेकांसाठीचा द्वेष, सूड भावनाही यात दिसत आहे. त्यांचे प्रेम एवढ्या टोकाला का पोहोचते, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
संकेत माने (Director Sanket Mane) दिग्दर्शित 'मन कस्तुरी रे' येत्या ४ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नितीन केणी यांच्या नेतृत्वाखाली, मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, व्यंकट अत्तिली, मृत्यूंजय किचंबरे यांच्या इमेन्स डायमेंशन एन्टरटेनमेंट ॲण्ड आर्ट्स निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते ड्रॅगन वॅाटर फिल्म्सचे निशीता केणी आणि करण कोंडे आहेत. वितरणाचे काम युएफओ सिने मीडिया नेटवर्क करणार असून संगीत प्रदर्शनाची धुरा टिप्सने सांभाळली आहे. नितीन केणी यांनी यापूर्वी ‘सैराट’सह अनेक सुपरहिट चित्रपटांच्या निर्मितीची धुरा सांभाळली असून ‘मन कस्तुरी रे’चे प्रस्तुतकर्ता आहेत.
हेही वाचा -परकीय चलन तुटवड्यामुळे नोरा फतेहीच्या डान्सवर बंदी, चाहते चक्रावले