मुंबई - 'रूप नगर के चीते' या वेगळ्या विषयावरील चित्रपटाचा पहिला टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. दोन मित्रांच्या सत्यकथेवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. करण किशोर परब आणि कुणाल शुक्ला हे नवोदित कलाकार यात झळकणार आहेत. बॉलिवूडमधील निर्माता विपुल अमृतलाल शाह यांचे पुतणे मनन शाह यांनी एस एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली 'रूप नगर के चीते' या मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे. विहान सूर्यवंशी हे 'रूप नगर के चीते'चं दिग्दर्शन करीत आहेत. १६ सप्टेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.
या मराठी सिनेमाचं शीर्षक असं हिंदी का? असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडेल, पण त्यामागील कारणही तसंच आहे. 'रूप नगर के चीते' हे सिनेमाचं शीर्षक 90 च्या दशकात प्रदर्शित झालेल्या एका हिंदी सिनेमात असलेल्या 'हम रूप नगर के चीते है, शिकार पर ही जीते है' या गाजलेल्या संवादावरून प्रेरीत आहे. हा सिनेमा मुख्य भूमिकेत असलेले दोन चीते म्हणजेच जीवलग मित्रांवर बेतलेला असल्यामुळेच हे शीर्षक 'रूप नगर के चीते' ठेवण्यामागील दुसरं कारण आहे.