मुंबई - गेल्या काही वर्षांत ऐतिहासिक चित्रपटांची रांग लागलेली दिसत आहे. त्यातही मराठी चित्रपटसृष्टीत शिवकालीन चित्रपटांना पाठिंबा मिळत असल्यामुळे त्या कालखंडातील अनेक कथा सिनेमारुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात अजून एका चित्रपटाची भर पडलीय, ती म्हणजे रणमर्दिनी, रणरागिणी महाराणी ताराबाई राजाराम भोसले यांच्या शौर्याची गाथा सांगणारा चित्रपट 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’.
अवघ्या २५ वर्षांची मराठ्यांची राणी, जिने मुठभर मावळ्यांच्या साथीने स्वराज्य जिंकायला आलेल्या औरंगजेबाला कायमचा या मातीत गाडला, त्या महाराणी ताराबाई राजाराम भोसले यांच्या दृष्टिकोनातून मराठ्यांच्या अखंडित लढ्याची कहाणी उलगडणार असून 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'ची पहिली झलक नुकतीच बाहेर आली आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या 'मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी' या ग्रंथावर आधारित 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा चित्रपट असून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे..
या चित्रपटाच्या टिझरमध्ये मराठा साम्राज्याला निडरपणे सांभाळणाऱ्या, तिन्ही छत्रपतींचे छत्र हरवल्यानंतर, छत्रपती ताराराणीच्या कर्तृत्वाचे गोडवे अनुभवायला मिळतील याची कल्पना येते. मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याचे हे विलक्षण पर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचेल आणि असामान्य शौर्य दाखवणाऱ्या, रणांगण गाजवणाऱ्या, आक्रमक राजकारणी छत्रपती ताराराणी यांची युद्धनिपुणता आणि आक्रमक राजकीय मुत्सद्देगिरी प्रामुख्याने समोर येईल असे दिसते. छत्रपती ताराराणी यांना कोणत्या प्रसंगांत हे नेतृत्व स्वीकारावे लागले याची पार्श्वभूमीदेखील उलगडेल. असामान्य शौर्य दाखवणाऱ्या, रणांगण गाजवणाऱ्या ताराराणी यांच्यावरील तीन छत्रपतींचे छत्र हरविल्यामुळे त्यांच्यातील कणखरपणा अनेक स्त्रियांना स्फूर्तिदायक ठरेल असा निर्मात्यांना विश्वास वाटतो. महाराणी ताराबाई राजाराम भोसले म्हणजे स्त्रीनेतृत्वाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे असे ते म्हणतात. मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याचे हे विलक्षण पर्व आहे जिथे आक्रमक राजकारणी छत्रपती ताराराणी यांची झलक दिसत आहे.