महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Teaser release of Aathwani : अपूर्ण प्रेमकथेची पूर्ण गोष्ट कहानी सांगणारा आठवणी - Aathwani presented by Minash Productions

प्रत्येक असफल प्रेमाची गोष्ट कधी ना कधी तरी उलगडली जाऊ शकते, याच विषयावर चित्रपट बनलाय आठवणी. डॉ. मोहन अगाशे आणि सुहास जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धांत सावंतने केलंय. याचा टीझर आपल्याला जुन्या आठवणीच्या जगात घेऊन जाणारा आहे.

Teaser release of Aathwani
अपूर्ण प्रेमकथेची पूर्ण गोष्ट कहानी सांगणारा आठवणी

By

Published : Jun 20, 2023, 4:21 PM IST

मुंबई - प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी प्रेमकथा असते जी अपूर्ण राहिलेली असते, अर्थात काही अपवाद वगळता. परंतु प्रत्येकाच्या हृदयाच्या कोपऱ्यात एक गोष्ट दडून बसलेली असते आणि त्यावरील खपली निघाली की मन सुन्न होते. परंतु त्या आठवणींमध्ये रमायला आवडत असतं. अशीच एक अपूर्ण प्रेमकथेची पूर्ण गोष्ट घेऊन येताहेत लेखक-दिग्दर्शक सिद्धांत सावंत आपला आगामी चित्रपट 'आठवणी' मधून. प्रेमकथेच्या ‘आठवणी’ पत्रातून उलगडताना दिसणार असून नुकत्याच रिलीज झालेल्या टिझर मधून दोन पिढ्यांच्या प्रेमाचा आवाका पहावयास मिळणार असल्याचे कळते.

आजच्या मेल, व्हॉट्सअप, फेसबुक सारख्या माध्यमांतून प्रेमाची देवाण घेवाण होताना दिसते. बदलत्या काळानुसार संवादाची माध्यमे बदलत असताना प्रेम मात्र तसेच आहे. हळुवार आणि तरल. ‘आठवणी’ या चित्रपटामधून दोन पिढ्यांच्या प्रेमकथा दृश्य माध्यमातून सादर होताना दिसणार आहे. यात अत्यंत अनोख्या प्रेमकथेची गोष्ट पत्रांद्वारे उलगडून दोन पिढ्यांच्या अंतरंगातील भावभावना प्रेक्षकांसमोर येतील.
सिद्धांत सावंत लिखित-दिग्दर्शित ‘आठवणी’ मधून प्रेमाच्या विषयाला भावनिकतेने साद घातल्याचे दिसून येईल. हा एक कौटुंबिक चित्रपट असून अनेकांसाठी तो मूड चेन्जर ठरेल असे दिग्दर्शकाचे मत आहे. दोन पिढ्या आणि त्यांचे दोन काळ प्रभावीपणे उभे करण्यात सिनेमॅटोग्राफर ध्रुव देसाई यशस्वी झाले आहेत हे टिझर पाहून समजते.

या चित्रपटात ज्येष्ठ कलाकार डॉ. मोहन आगाशे आणि सुहास जोशी हे प्रमुख भूमिकांत असून त्यांच्यासोबत तीन तरुण आश्वासक चेहरे आहेत ते म्हणजे सुहृद वार्डेकर, निनाद सावंत आणि वैष्णवी करमरकर. या चित्रपटाची निर्मिती सिद्धांत सावंत व अशोक सावंत यांनी केली असून मिनाश प्रॉडक्शनने प्रस्तुती केली आहे. चित्रपटाचा टीझर आपल्याला साधारण कथेची ओळख करुन देतो. एका लेखकाच्या हाती एक जुने प्रेम पत्र लागते. त्या आधारे तो त्या व्यक्तींचा शोध घ्यायला जातो. चार दशकापूर्वी संपलेली प्रेम कहानी यापुढे हळुवार उलडताना यात दिसत आहे.


येत्या ७ जुलैला ‘आठवणी’ हा चित्रपट महाराष्ट्रभरात चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details