मुंबई - नुकताच ‘एकदा काय झालं!!’ या चित्रपटाचा टिझर आणि संगीत सोहळा दिमाखात पार पडला. प्रसिद्ध गायक संगीतकार शंकर महादेवन, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांच्या हस्ते टीझर लॉन्च करण्यात आला. तर सुनिधी चौहान, शुभंकर कुलकर्णी यांनी चित्रपटातील गाणी सादर केली. या कार्यक्रम सोहळ्याला चित्रपटातील सर्व कलाकारांनी व निमंत्रितांनी उपस्थिती लावली. कौशल इनामदार, चिन्मयी सुमीत, मृण्मयी देशपांडे, फुलवा खामकर, ऋचा इनामदार उपस्थित होते.
या चित्रपटाच्या निमित्ताने डॉ. सलील कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार अशी तिहेरी कामगिरी केलेली आहे. विशेष बाब म्हणजे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचे मार्गदर्शन या चित्रपटाला लाभले आहे, तर त्यांचा मुलगा आणि संगीतकार सिद्धार्थ महादेवन, शोबॉक्स एन्टरटेंन्मेंटच्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करत आहे.
या चित्रपटात अभिनेता सुमीत राघवन, उर्मिला कोठारे, बालकलाकार अर्जुन पुर्णपात्रे यांच्या मुख्य भूमिका असून, टीझरमध्ये एक वेगळ्या प्रकारची शाळा दिसतेय. अनेक लहान मुले दिसत आहेत. गोष्टी सांगणाऱ्या माणसावर आधारित ही चित्रपटाची कथा आहे. तसेच बाबा आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारी आणि नात्यांवर नवा प्रकाश टाकणारी अशी या चित्रपटाची कथा आहे. मोहन आगाशे, सुहास जोशी, मुक्ता बर्वे, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले या कलाकारांनी आपल्या अभिनयाने चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे.