बेंगळुरू (कर्नाटक) : टीडीपी नेते आणि टॉलीवूड अभिनेता नंदामुरी तारका रत्न यांचे शनिवारी निधन झाले. 23 दिवसांपूर्वी त्यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस नारा लोकेश यांच्या 'युवागलम पदयात्रे'च्या उद्घाटनाच्या वेळी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर बेंगळुरू शहरातील एका खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होता. निधनाच्या वेळी ते 40 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी अलेख्या रेड्डी आणि एक मूल आहे.
पदयात्रेत हृदयविकाराचा झटका : तेलुगू चित्रपट सृष्टीने तारका रत्न यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते जुन्या काळातील तेलुगू सुपरस्टार आणि माजी मुख्यमंत्री एन टी रामाराव यांचे नातू आहेत. तसेच ते टॉलिवूडचा स्टार अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि कल्याण राम यांचे चुलत भाऊ आहेत. आंध्र प्रदेशातील कुप्पम येथे नारा लोकेश यांच्या पदयात्रेत भाग घेत असताना तारका रत्न यांना हृदयविकाराचा झटका आला होता. टीडीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू कुप्पम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व दीर्घकाळापासून करत आहेत. या ठिकाणाहून नारा लोकेश यांनी आपल्या राज्यव्यापी पदयात्रेच्या उद्घाटनाची योजना आखली होती.
तेलुगू चित्रपटसृष्टीत शोककळा : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी, टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, जनसेना प्रमुख पवन कल्याण आणि अनेक राजकीय नेत्यांनी शोकसंतप्त कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे. टॉलिवूड अभिनेता के चिरंजीवी, अल्लू अर्जुन आणि इतरांनी तारका रत्न यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. हा जीवघेणा हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी तारका रत्ना अनेक आरोग्य समस्यांनी त्रस्त होते.