मुंबई- अभिनेता विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांच्यात प्रेम प्रकरण सुरू असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यापासून सतत सुरू असते. याबद्दल विजयला अनेक वेळा छेडण्यात आले होते. दहाडच्या प्रमोशन दरम्यान यावरुन गुलशन देवय्यानेही त्याची मस्करी केली होती. मात्र त्याने याविषयावर मौन बाळगणे पसंत केले होते. तमन्नानेही आपले नाते आजवर गुलदस्त्यात ठेवले आहे. मात्र नुकत्याच पार पडलेल्या एका मुलाखतीत तिने यावरील मौन सोडले आणि त्यांच्या संगतीत आनंद होतो अशी कबुली देऊन टाकली.
विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया लस्ट स्टोरीज २ मध्ये काम करत आहेत. सध्या दोघेही याचे प्रमोशन करीत आहेत. नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार असलेल्या या चित्रपटात दोघेही अतिशय सुंदर दिसत आहेत. त्यांच्यातील प्रेम प्रकरणाबाबत दोघांनाही नेहमी विचारण्यात येत असते. असाच प्रश्न तमन्नाला मुलाखतीत विचारण्यात आला होता. यावर ती म्हणाली की, 'सहकलाकारांसोबत काम करत असताना आपण त्यांच्याकडे आकर्षित होतो. अशा वेळी एखाद्याच्या बाबतीत काही वाटले तर ते पूर्णतः वैयक्तिक गोष्ट आहे. तो एक असा व्यक्ती आहे ज्याच्याशी मी अतिशय नैसर्गिकपणे वागते. तो एक असा व्यक्ती आहे ज्याच्या बद्दल मला मनापासून काळजी वाटते, त्याची संगत मला आनंददायी वाटते'. अशा आशयाचे वक्तव्य तिने या मुलाखतीत केल्यानंतर तमन्ना आणि विजय वर्मा यांच्यात आजवर सुरू असलेल्या नात्याच्या चर्चेला का अर्थाने तमन्नाने पूर्ण विराम दिला आहे.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या डेटिंगच्या अफवांना गोव्यातील नवीन वर्षाच्या पार्टीनंतर ऊत आला. या पार्टीत दोघे चुंबन घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर ते अनेकवेळा एकत्र दिसले, पण त्यांनी प्रेमाच्या नात्याला कधीही दुजोरा दिला नाही. मात्र त्यांच्याशी संबंधीत सहकलाकारांना याची कुणकुण न लागल्यास आश्चर्य वाटेल. म्हणूनच जेव्हा दहाडच्या प्रमोशन दरम्यान विजयला विचारण्यात आले तेव्हा देवय्याने त्याच्याकडे पाहात म्हटले की, हमारी तमन्ना थी की स्माईल देखने को मिलेगा. यावर विजय लाजून चूर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.