महाराष्ट्र

maharashtra

बॉलिवूडकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असताना बॉक्स ऑफिसवर टकाटकची दमदार कामगिरी

By

Published : Aug 23, 2022, 11:43 AM IST

हिंदी चित्रपट सपाटून मार खात असताना मराठी सिनेमे चांगली ओपनिंग घेताना दिसताहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या टकाटक २ ने पहिल्या वीकेंडला २.११ कोटींचा बिझनेस केला असून त्याची घोडदौड सुरु आहे.

बॉक्स ऑफिसवर टकाटकची दमदार कामगिरी
बॉक्स ऑफिसवर टकाटकची दमदार कामगिरी

मुंबई- मराठी चित्रपटांना पुन्हा सुगीचे दिवस आल्यासारखे वाटताहेत. हिंदी चित्रपट सपाटून मार खात असताना मराठी सिनेमे चांगली ओपनिंग घेताना दिसताहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या टकाटक २ ने पहिल्या वीकेंडला २.११ कोटींचा बिझनेस केला असून त्याची घोडदौड सुरु आहे. मराठी प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा टकाटक मनोरंजनाचा खजिना खुला झाला आहे. मराठी तिकिटबारीवर प्रेक्षक टकाटक मनोरंजनाची जादू अनुभवत आहेत. टकाटकच्या पहिल्या भागाने मराठी प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यश मिळवलं होतं. जन्माष्टमीच्या मुहूर्तावर १८ ऑगस्ट रोजी टकाटक २ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला आहे. दुसऱ्या दिवशी गोपाळकाल्याचा सण असतानाही प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्याला प्राधान्य दिलं. शनिवार आणि रविवारी या चित्रपटानं सिनेमागृहांमध्ये धुमाकूळ घालत प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं.

हा चित्रपट पाहण्यासाठी फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच प्रेक्षक गर्दी करत आहेत त्यामुळे टकाटक २च्या खात्यावर पहिल्या वीकेंडला तब्बल २.११ कोटी रुपयांचा गल्ला जमा झाला आहे. सुरेख संकल्पना, आशयघन कथानक, अर्थपूर्ण संवादलेखन, लक्षवेधी अभिनय, विनोदामागे दडलेला संदेश, सुमधूर गीत-संगीत रचना, कलात्मक दिग्दर्शन आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या बळावर या चित्रपटानं रसिकांचं मन जिंकलं आहे. महाराष्ट्रातील बर्‍याच चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट गर्दी खेचत आहे.

आज जिथे हिंदी चित्रपट पाहण्यासाठीही प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळत नसताना टकाटक २ नं पुन्हा एकदा रसिकांना सिनेमागृहांपर्यंत आणण्याची किमया केली आहे. विशेष म्हणजे पुरुषांप्रमाणेच महिलांनाही या चित्रपटानं मोहिनी घातली आहे. यातील मैत्रीच्या मुद्द्यासोबतच चित्रपटात देण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण संदेशाचे प्रेक्षक तोंड भरून कौतुक करत आहेत. यामुळेच दिवसागणिक टकाटक २ पाहण्याची इच्छा असणारे प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये येत आहेत.

टकाटक २चं दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केलं असून, संकल्पना-कथा-पटकथा लेखनही त्यांनीच केलं आहे. प्रथमेश परब, अजिंक्य राऊत, प्रणाली भालेराव, अक्षय केळकर, भूमिका कदम, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजशेखर, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे या कलाकारांनी चित्रपटात केलेली धमाल प्रेक्षक एन्जॅाय करत आहेत. संवादलेखन किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी केलं आहे. हजरत शेख वली यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, अभिनय जगताप यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. निलेश गुंडाळे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

'टकाटक २' निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओने, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, आदित्य जोशी, नरेश चौधरी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

हेही वाचा -अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या पुष्पा २ च्या शूटिंगला झाली पूजेने सुरूवात

ABOUT THE AUTHOR

...view details