मुंबई- अजय देवगण दिग्दर्शित करत असलेल्या भोला या चित्रपटातील अभिनेत्री तब्बूचा आक्रमक करारी लूक प्रसिध्द झाला आहे. अजयने ट्विटरवर तिच्या फर्स्ट लूकची झलक एका क्लिपमधून दाखवली आहे. यात तब्बू पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसत आहे.
या लूकसह या व्हिडिओ क्लिपमध्ये तिचा दमदार डायलॉगही ऐकू येतो. ती हिंदीत म्हणते, 'आज रात या तो वो हमे ढूँढ लेगा, या हम उसे, बंदूक की नौकरी की है, गोली तो खानी पडेगी.'
अजय देवगण सध्या 'दृष्यम २' चे यश अनुभवत आहे. भारतासह जगभर या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद प्रेक्षक देत आहेत. याचदरम्यान त्याच्या आगामी भोला या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. यात अजय देवगण अत्यंत साहसी, गुढ आणि आक्रमक दिसत आहे. टीझरची सुरुवात एका अनाथ आश्रमापासून होते. यात एका अनाथ मुलीला सांगितले जाते की तू सकाळी लवकर उठ, तुला भेटायला कोणीतरी येणार आहे. ही मुलगी आपली इतर सहकारी बालमैत्रीणींना विचारते की नातेवाईक कोण कोण असतात? तर थोडक्यात ही अनाथ मुलीच्या आयुष्यता तिच्या जवळचे कोणी तरी भेटायला येणार आहे.
दुसरीकडे एक कैदी भगवद्गगीता वाचताना दिसतो. त्याची सुटका झाली आहे आणि आता तो जेलबाहेर पडणार आहे. हा अद्भूत कैदी भोला आहे. तो कैदी का झाला इथंपासून ते अनाथ मुलीच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीचा कथापट भोलामध्ये पाहायला मिळणार आहे.