मुंबई - TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कॉमेडी शो गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 2008 मध्ये सुरू झालेला हा शो सर्व वयोगटातील लोकांना पाहायला आवडतो. या शोचा टीआरपी अजूनही चांगला आहे. या शोमधील आवडत्या पात्राबद्दल बोलायचं झालं तर ती दुसरी कोणी नसून दयाबेन आहे. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून दयाबेनच्या पुनरागमनाची वाट अनेकजण पाहत आहेत. आता प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपणार आहे, या आगामी एपिसोड्समध्ये दयाबेन धमाकेदार एन्ट्री करणार आहे. शोमध्ये दयाबेनचे स्वागत करण्यासाठी जेठालाल उत्साहित दिसत होते. जेठालालचा आनंद पाहून चाहतेही खूश आहेत.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेनची होणार एंट्री :आगामी एपिसोडमध्ये, सुंदर जेठालालला दयाबेनला परत आणण्याचे वचन देतो असं दाखवण्यात आलं आहे. तो दिवाळीच्या मुहूर्तावर दयाबेनला गोकुळधाममध्ये आणणार असल्याचं म्हणतो. दरम्यान या प्रोमोमध्ये जेठालाल, टप्पू आणि बापूजी दयाबेनच्या आगमनाच्या आनंदात गरबा खेळताना दिसत आहेत. एकीकडे दयाबेनच्या आगमनाने अंजली आनंदात आहे. तर दुसरीकडे तिचा पती तारक मेहता नाराज दिसत आहे. तारक मेहताला अजूनही दयाबेनच्या पुनरागमनाबद्दल शंका आहे. प्रोमो पाहिल्यानंतरही अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे की, निर्माते पुन्हा विनोद करत आहेत. दयाबेन परतणार की नाही हे येत्या एपिसोडमध्येच कळेल.