मुंबई- अभिनेता सलमान खाननंतर ( Salman Khan ) आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करलाही जीवे मारण्याच्या धमक्या ( swara bhaskar receives death threat ) मिळाल्याचे प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे अभिनेत्रीला तिच्या वर्सोवा येथील घरी धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे. क्षणाचाही विलंब न लावता अभिनेत्रीने या प्रकरणाची मुंबई पोलिसांकडे तक्रारही ( Mumbai Police ) केली आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
स्वराला हे धमकीचे पत्र ( threatening letter to Swara ) कोणी पाठवले आहे, याबाबत सध्या काहीच सुगावा लागलेला नाही. या संदर्भात मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
अभिनेत्रीला मिळालेले धमकीचे पत्र हिंदी भाषेत लिहिलेले आहे. यामध्ये अभिनेत्रीला वीर सावरकरांचा अपमान न करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
धमकीच्या पत्रात काय लिहिलं आहे? - अभिनेत्रीला मिळालेल्या धमकीच्या पत्रात देशाच्या तरुण वीर सावरकरांचा अपमान अजिबात सहन केला जाणार नाही असं लिहिलं आहे. या धमकीच्या पत्रात अभिनेत्रीसाठी अपशब्द वापरण्यात आले आहेत. पत्राच्या शेवटी 'देश के युवा' अशी सही करण्यात आली आहे.
स्वरा भास्कर देशाच्या राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर खुलेपणाने आपले मत मांडते. कंगना रणौतप्रमाणेच ती तिच्या स्पष्टवक्ते आणि बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते.
सावरकरांबद्दल अभिनेत्रीने काय लिहिले? - ही गोष्ट 2017 सालची आहे. तेव्हा अभिनेत्रीने सोशल मीडियावर वीर सावरकरांबद्दल तिच्या ट्विटमध्ये लिहिल्यानंतर लोकांमध्ये खळबळ उडाली होती. स्वराने आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, 'तुरुंगातून बाहेर सोडण्यासाठी सावरकरांनी ब्रिटिश सरकारची माफी मागितली होती. त्यामुळे निश्चितच ते 'वीर' होऊ शकत नाहीत.'
हेही वाचा -अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन'मधील पहिले गाणे रिलीज