मुंबई - सनी लिओनी गेली ११ वर्षे भारतीय चित्रपट उद्योगात सक्रिय वावरत आहे. तिचे चित्रपट फार गाजले असे नाही, परंतु तिला एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली. तिने अलिकडे दिलेल्या मुलाखतीत एक मनाला लागलेली खंत बोलून दाखवली. तिच्या मते २०१६ मध्ये एका पत्रकाराने घेतलेली मुलाखत तिला खूप त्रासदायक ठरली होती. तो पत्रकार तिला वारंवार तिच्या भूतकाळाबद्दलचे नानाविध प्रश्न विचारत होता आणि लैंगिकतावादी म्हणत आक्षेपार्ह विधाने करत होता. ही मुलाखत खूप चर्चेचा विषय ठरली होती. सनीने 'जिस्म २' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले. याला आता एक दशकाहून अधिक काळ होऊन गेला आहे.
'मला वाटते त्या मुलाखतीतले काही मुद्दे खालच्या पातळीवरचे निश्चितपणे होते आणि तो कंदरीत प्रवास माझ्यासाठी विदारक होता. एखादा चित्रपट चालत नाही तेव्हा फार बरे वाटत नाही, त्यात काही 'लैला' आणि 'बेबीडॉल' सारखे चित्रपटही असतील. काही चित्रपट खूपच आश्चर्यकारक बनले आणि आता 'केनेडी' हा चित्रपट माझ्या संपूर्ण कारकिर्दीत घडलेली सर्वात प्रतिक्षित गोष्ट आहे', अशा आशयाचे विधान आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत सनीने केले.
सनी लिओनीचा जन्म कॅनडात झाला आहे आणि ती भारतीय वंशाची आहे. तिचे सनी हे टोपन नाव असून खरे नाव करनजीत कौर वोहरा असे आहे. पूर्व आयुष्याला विराम देऊन ती भारतात आली आणि तिने इथल्या मुख्य प्रवाहातील टीव्ही शो आणि चित्रपटातून भूमिका केल्या. २०११ मध्ये तिने बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. त्यानंतर तिने भारतीय रिअॅलिटी शो स्प्लिट्सविला देखील होस्ट केला आहे. त्यानंतर ती 'जॅकपॉट', 'रागिनी एमएमएस 2', 'एक पहेली लीला' आणि 'तेरा इंतजार' यासारख्या चित्रपटामध्ये दिसली होती.
तिचा करनजीतपासून ते सनी लिओनी बनण्यापर्यंतचा प्रवास संघर्षांशिवाय नव्हता. याविषयी बोलताना सनी लिओनी म्हणाली, ' मला खूप संघर्ष करावा लागला आणि प्रतिकूल परिस्थितीशी झगडावे लागले. यातून मला योग्य मार्ग शोधायचा होता. माझ्यात क्षमता आणि प्रतिभा आहे हे लोकांना दाखवून द्यायचे होते. असे असले तरी लढणे तितके सोपे नव्हते. माझ्या पाठीशी डॅनियल ठाम राहिला आणि अनेक चांगल्या लोकांसोबत प्रोजेक्ट करत बऱ्याच अडथळ्यांचा सामना केला.'