मुंबई - Sunny Leone missing girl : सनी लिओनीनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून बेपत्ता मुलीच्या शोधासाठी मदत करण्याचं आवाहन केलं होतं. यासाठी तिनं स्वतः 50 हजार रुपये बक्षीस देणार असल्याचंही जाहीर केलं होतं. ही मुलगी आता सापडली असल्याचं तिनं लेटेस्ट पोस्टवरुन कळवलंय.
सनी लिओनीनं सोशल मीडियावर एका मुलीचा फोटो पोस्ट करुन एक लिहिलं होतं, 'ही मुलगी तिच्या घरी कुटुंबामध्ये सुखरूप परतावी यासाठी मी अतिरिक्त 50,000 रुपये देईन. अनुष्का ही माझ्या घरी मदतनीस असलेल्याची 9 वर्षाची मुलगी आहे. ती गेल्या 8 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 7 वाजल्यापासून जोगेश्वरी पश्चिम बेहराम बाग शेज हाऊस 9 पासून बेपत्ता आहे. या मुलीबद्दल काही समजल्यास तिच्या आई वडीलांकडून 11 हजारची रक्कम रोख देण्यात येईल. कृपया सतर्क राहून या मुलीचा शोध घ्या व तिची आई सरिता किंवा वडील किरण अथवा माझ्याशी संपर्क साधा.' आपल्या पोस्टमध्ये बेपत्ता झालेल्या मुलीच्या आई वडीलांचे फोन क्रमांकही दिले होते.
आता ही मुलगी तिच्या आई वडीलांकडे सुखरुप परत आलीय. ही माहिती सनी लिओननं एक नवी पोस्ट लिहून कळवलीय. तिनं लिहिलंय, 'आमच्या प्रार्थनेला ईश्वरानं प्रतिसाद दिला. इश्वर श्रेष्ठ आहे. देव या कुटुंबाला आशीर्वाद देवो.'
सनीनं कुटुंबाच्या वतीनंही आभार मानताना लिहिलंय, 'मुंबई पोलिसांचे खूप आभार. बेपत्ता झाल्यानंतर 24 तासामध्ये अनुष्का परत मिळाली आहे. पोस्ट शेअर करणाऱ्या व व्हायरल करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे खूप आभार. प्रत्येकाला हृदयापासून धन्यवाद.'