मुंबई - Sunny Deol and Salman Khan: 'टायगर 3' हा चित्रपट 12 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. सलमान खानचा 'टायगर 3' सध्या रुपेरी पडद्यावर चांगलीच कमाई करत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण केलंय. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये खूप गर्दी होताना दिसतेय. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत. 'टायगर 3' देशातच नाही तर जगभरात चांगली कमाई करत आहे. दरम्यान, अभिनेता सनी देओलनं चित्रपटाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केलाय. त्यानं सलमान खानसोबतचा फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलीय.
सनीनं सलमानसोबतचा फोटो शेअर केला : 'टायगर 3' च्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर पहिल्याच दिवशी या चित्रपटानं भारतात 44.5 कोटींचा व्यवसाय केला. पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमध्येच 'टायगर 3'नं 'गदर 2'ला मागे टाकलं होतं. देशांतर्गत या चित्रपटानं 236.43 कोटीची कमाई केली आहे. वर्ल्डवाइड 'टायगर 3'नं आतापर्यंत 371 कोटी रुपये कमवलेत. चित्रपटाच्या शानदार कलेक्शननंतर सनीनं सलमानचं अभिनंदन केलंय. सनीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहलं, 'जिंकलो'. या फोटोमध्ये सनी देओल सलमान खानच्या खांद्यावर हात ठेवून उभा आहे. फोटोत भाईजाननं रॉयल ब्ल्यू रंगाचा शर्ट घातलाय. याशिवाय सनीनं फोटोत लाईट ब्राऊन टी-शर्टसह ऑफ व्हाईट कलरचा ब्लेजर घातला आहे. दोघेही फोटोमध्ये खूप सुंदर दिसताहेत.