मुंबई- Dunki first show on the first day : शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाची प्रतीक्षा संपली असून गुरुवारी पहाटेपासूनच चाहत्यांनी थिएटरच्या बाहेर रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं. शाहरुख आणि राजकुमार हिराणी हे नवं समीकरण पहिल्यांदाच पाहायला मिळणार असल्यामुळे दोघांच्याही चाहत्यांमध्ये अमाप उत्साह पाहायला मिळतोय. आज पहिल्या दिवशी पहिला शो पाहणाऱ्यामध्ये कॉमेडियन सुनिल पाल देखील होता. त्यानं 'डंकी'ची तीन तिकीटे बुक केली होती आणि शाहरुखचा हा चित्रपट हॅट्रीक करणार असल्याची भावना त्यानं व्यक्त केली.
त्याच्या 'डंकी' पाहण्याच्या उत्साहाबद्दल थिएटरच्या रांगेत उभं राहून बोलताना तो म्हणाला, "तुम्ही पाहताय सगळीकडे शाहरुखच्या घोषणा ऐकू येत आहेत. मी टोपीही घातलीय त्यावर एक स्टार दिसतोय तो एकमेव तारा शाहरुख खान आहे. मी पहिल्यापासूनच त्याचा चाहता राहिलो आहे. मी त्याचा प्रत्येक चित्रपट पाहिला आहे. आज मॉर्निंग शो आहे. मी ठरवलं पहिल्या दिवशी पहिला शो पाहायचा, त्यासाठी मी तीन तिकीटे काढली आहेत. तीन तिकीटांचा अर्थ आहे हॅट्रीक. शाहरुख खानच्या 'पठाण' आणि 'जवान' नंतर आता हॅट्रीक होईल. दोन हजार कोटीचा गल्ला तर जमणारच भाई, एक हजार शाहरुखचे आणि एक हजार राजकुमार हिराणीसाठी. दोन्ही जादुगार आहेत, दोन्ही बाजीगर आहेत."