महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Marathi film Ankush : 'अंकुश'सह नव्या निर्मात्याची दमदार एन्ट्री, बिग बजेट चित्रपटांची करणार मराठीत निर्मिती - टिझर पोस्टरचे लॉन्चिंग

'मला मराठी चित्रपटांच्या निर्मिती मुल्यांना उंचीवर न्यायचे आहे', असे म्हणत सातत्याने मराठी चित्रपटांची निर्मिती करणार असल्याचे निर्माते राजाभऊ घुले यांनी म्हटलंय. 'अंकुश' या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली असून लवकरच याच्या टिझर पोस्टरचे लॉन्चिंग होणार आहे.

Etv Bharat
'अंकुश'सह नव्या निर्मात्याची दमदार एन्ट्री

By

Published : Jul 14, 2023, 3:56 PM IST

मुंबई - मराठी चित्रपट त्यातील आगळ्या वेगळ्या आशयासाठी जाणला जातो. विषयांची श्रीमंती ही त्याची खासियत आहे. परंतु तेच निर्मिती मुल्यांबाबत म्हणता येणार नाही. चांगली निर्मितीमुल्ये असण्यासाठी बजेट तगडे असण्याची गरज असते आणि बहुतांश मराठी चित्रपट त्यात तोकडे पडतात. मराठी चित्रपट व्यवसायात प्रतिभासंपन्न कलाकार तसेच उत्तम संहिताही आहेत. परंतु त्याला उत्तम निर्मिती मुल्यांची जोड मिळत नसल्यामुळे ते प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आकृष्ट करू शकत नाहीत. परंतु हळूहळू बदल घडताना दिसताहेत आणि काही निर्माते मराठी चित्रपट भव्य दिव्य व्हावा यासाठी धडपडताना दिसत आहेत.

आता एक नवीन निर्माता मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे आणि आपली पहिली कलाकृती 'अंकुश' प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणत आहे. मराठी सिनेसृष्टीत, पेशाने व्यावसायिक असलेले, राजाभाऊ आप्पाराव घुले चित्रपट निर्माते म्हणून पदार्पण करीत असून त्यांनी अंकुश चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांच्या ओमकार फिल्म्स क्रिएशन या निर्मितीसंस्थेची 'अंकुश' ही पहिली निर्मिती असून लवकरच या चित्रपटाचे टिझर पोस्टर लॉन्च करण्यात येणार आहे.

बिग बजेट चित्रपटांचा ध्यास असलेल्या राजाभाऊ आप्पाराव घुले यांनी अंकुश चित्रपटामध्ये वेगळ्या धाटणीची प्रेमकहाणी पेश केली आहे. त्याच्या जोडीला रोमहर्षक साहसदृश्ये असून कलाकारांची तगडी फौज यातून दिसणार आहे. उत्तम निर्मितीमुल्ये असलेल्या या चित्रपटाद्वारे उत्तम सामाजिक संदेशही देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे सर्व करताना त्यांनी प्रत्येक विभागासाठी अत्यंत अनुभवी लोकांची निवड केली आहे. 'अंकुश'साठी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ॲक्शन डायरेक्टर आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरियोग्रफर यांना पाचारण केलेले असून चित्रपटातील गाणी परदेशात चित्रित करण्यात आली आहेत. संगीतासाठी प्रसिद्ध संगीतकाराची निवड करण्यात आली आहे.

'अंकुश' चे राजाभाऊ आप्पाराव घुले म्हणाले की, 'मला मराठी चित्रपटांच्या निर्मिती मुल्यांना उंचीवर न्यायचे आहे. मी मराठी आणि हिंदी चित्रपट निर्मिती करणार असून फक्त एक दोन चित्रपट बनवून मला काढता पाय घ्यायचा नाहीये. तसेच माझ्या चित्रपटांतून अनेक होतकरू आणि सुप्रसिद्ध कलाकारांना संधी देण्यात येणार असून वेगळ्या वाटेवरील चित्रपट देखील बनवायचे आहेत. परंतु नेहमीच बिग बजेट चित्रपटांची, खासकरून मराठी, निर्मिती करण्याचा माझा मानस असून अंकुश हे पहिले पाऊल आहे.'

ABOUT THE AUTHOR

...view details