हैदराबाद- गेली काही महिने परदेशात घालवल्यानंतर ख्यातनाम दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी श्रमपरिहारासाठी कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घेतला. पुन्हा कामासाठी सज्ज होण्यासाठी व कंटाळा दूर करुन पुन्हा रिफ्रेश होण्यासाठी त्यांनी तामिळनाडूतील विविध मंदिरांना भेटी दिल्या. आरआरआर चित्रपटाचे प्रमोशन आणि त्यानंतर पार पडलेला ऑस्कर पुरस्कार सोहळा यामुळे राजामौली खूप कामात व्यग्र झाले होते.
या व्हिडिओत राजामौली कुटुंबासोबत मंदिरा बाहेर पोझ देताना दिसतात. मध्य तामिळनाडूतील अप्रतिम मंदिराची उंच शिखरे, त्यावर असलेली कलाकुसर, भव्य आणि नेत्रसुखद सभामंडपे, डोळ्यांना सुखावणारी कलाकुसर यांचे दर्शन त्यांनी व्हिडिओतून घडवलंय. शिवाय स्वतः बोट चालवताना ते दिसतात. प्राचिन मंदिरांच्या पार्श्वभूमीवर ही अध्यात्मिक सहल त्यांनी पार पाडलीय. दाक्षिणात्य मंदिरासोबतच तिथल्या खाद्य संस्कृतीचाही त्यांनी आनंद घेतल्याचे दिसून येते.
राजमौली यांनी एक व्हिडिओ शेअर करत आपल्या भेटीचा वृतांत चाहत्यांना दिला आहे. यात त्यांनी म्हटलंय की, 'मध्य तामिळनाडूमध्ये प्रवास करण्याची दीर्घकाळापासूनची मनिषा होती. माझ्या मुलीला मंदिर पाहायची होती, त्यामुळे आम्ही या प्रवासाला सुरुवात केली. जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात आम्ही श्रीरंगम, दारासुरम, ब्रिहाडीस्वारर कोइल, रामेश्वरम, कानडूकाथम, थोथूकुटी आणि मदुराईला भेटी दिल्या. याकाळात आम्ही हिमनगाच्या वरील भाग केवळ पाहू शकलो. पंड्या, चोल, नायक्कर यासह अनेकअप्रतिम वास्तु, सुंदर रचना आणि अध्यात्मिक विचार स्थळे खरोखरच विस्मयकारक आहेत.'
त्यांनी पुढे लिहिलंय की, 'सर्व ठिकाणांची खाद्य पदार्थ अप्रतिम होती. विशेषतः मंत्राकोडम, कुंबकर्णम किंवा रामेश्वरम येथील मुरुगन मेस या ठिकाणची जेवणाची ठिकाणी भारी होती. एका आठवड्यात माझे वजन तीन ते चार किलोंनी वाढलं असावं. परदेशातील तीन महिन्यांचा प्रवास आणि खाद्यापदार्थानंतर मायदेशातील ही सहल पुन्हा नवा उत्साह आणि जोम देणारी अशीच होती.'