मुंबई -कोरोनाचा कहर वरखाली होत असताना जॉन अब्राहमचे ‘मुंबई सागा’ आणि ‘सत्यमेव जयते २’ हे चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित झाले. मास्कधारी प्रेक्षकांनी ५०% आसनक्षमता असूनही ते चित्रपट सिनेमागृहांत जाऊन बघितले. आता त्याचा नवीन चित्रपट ‘अटॅक’ प्रदर्शित होतोय ज्याला प्रेक्षक १००% उपस्थिती दाखवू शकतील. त्याबद्दल आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी एका खास मुलाखतीत जॉन अब्राहम ला विचारले असता तो म्हणाला, “ही आनंदाची गोष्ट आहे की थिएटर्स १००% क्षमतेने सुरु झालीयेत. चित्रपटसृष्टीतर्फे मी त्याचे स्वागतच करतो. गेल्या काही दिवसांत काही चित्रपट (द काश्मीर फाईल्स, आरआरआर) बक्कळ कमाई करताना दिसत असून ही चित्रपटसृष्टीसाठी आनंदाची बाब आहे.
‘अटॅक’ हा माझा कोरोना महामारीनंतरचा पहिलाच चित्रपट आहे आणि तो प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल याची ग्वाही मी देतो. हा ॲक्शनपट असून मी याचा निर्माताही आहे. माझ्या जे ए एंटरटेन्मेन्ट ने नेहमीच उत्तम संहिता असलेले विकी डोनर, मद्रास कॅफे ई. चित्रपट दिलेत, हा चित्रपटही वेगळा असून यात ॲक्शन एखाद्या भावनेप्रमाणे असल्याचे दिसून येईल. मला स्वतःला ॲक्शनपट करायला आवडतात आणि माझ्यासाठी ॲक्शन म्हणजे ‘सेकंड नेचर’ अर्थात माझा दुसरा स्वभावच जणू. या चित्रपटाचा दिग्दर्शक, लक्ष्य राज आनंद, अतिशय तरुण आहे आणि आजच्या तरुणाईला आवडेल असा चित्रपट त्याने बनविला आहे. तसेच आमचा संगीतकार, शाश्वत सचदेव, हा देखील तरुण असून त्याचे संगीतही तरुणाईला भावेल असे आहे. थोडक्यात एका तरुण चमूने हा चित्रपट बनविला आहे.”
हिरॉइझमची व्याख्या वेगळी
गेल्या काही वर्षांत जॉन अब्राहम ने देशभक्तीपर चित्रपट बनविले आणि जॉन आजच्या काळातील मनोज कुमार बनला आहे का असे विचारल्यावर तो (हसत हसत) म्हणाला, “मला वाटलं की ती उपाधी अक्षय कुमारला दिलेली आहे. असो. मला देशभक्ती भरलेले चित्रपट बनवायला आवडतात. आधुनिक देशभक्त म्हणजे फक्त देशाचा झेंडा घेऊन फिरणं नव्हे. तो ‘जिंगोइझम’ असेल, फाजील आत्यंतिक देशाभिमान. माझ्यामते ‘हिरॉइझम’ ची व्याख्या वेगळी आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर, आता रशिया आणि युक्रेन चे युद्ध सुरु आहे आणि भारताने रशियाच्या बाजूने कौल दिला. आपल्याला माहित आहे की संकटकाळी रशिया आपल्यासाठी नेहमीच धावून आलाय. मी काही युद्धाचं समर्थन करीत नाहीये परंतु अमेरिकेसारखा देश आपल्यासाठी कधीच उभा नाही राहिला त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. आणि भारत खंबीरपणे आपल्या मतावर ठाम राहिला हा माझ्यासाठी ‘हिरॉइझम’ आहे. ‘अटॅक’ देशभक्ती, देशाची सुरक्षा यावर आधारित आहे.”
हेही वाचा -'कच्चा बदाम' गाण्यावर रितेश सोबत माधुरी दीक्षितचे जबरदस्त ठुमके - पाहा व्हिडिओ
सुपर सोल्जर
चित्रपटाची कथा जॉनने लिहिली असून त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला की, “हो. ‘अटॅक’ ची कथा मी लिहिलीय आणि लक्ष्यने त्यावर उत्तम काम केले आहे. हल्लीच्या काळात तरुणाई कॉम्प्युटरवर, मोबाईलवर ‘गेम्स’ खेळत असते ज्यात ‘सोल्जर’ गेम्स ची संख्या जास्त आहे. आमच्या चित्रपटाचे कथानक त्याच्या जवळपास जाणारे आहे. यात भारतीय लष्कर एक ‘सुपर सोल्जर’ बनविते जो देशाला अतिरेक्यांच्या हल्ल्यातून वाचवितो. खरंतर आपल्या देशाची रिसर्च विंग ‘डीआरडीओ’ ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ वापरून ‘सुपर सोल्जर’ ची निर्मिती करीत आहेत. त्याच ‘कॉन्सेप्ट’ वर हा चित्रपट बनला असून तो नक्कीच ‘फ्यूचरिस्टिक’ आहे. तसेच प्रेक्षकांनी अश्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना पाठिंबा देणे गरजेचे आहे नाहीतर त्यांना पुन्हा त्याच त्याच रटाळ कथांवरील बकवास चित्रपट बघायला मिळतील.”
सविता दामोदर परांजपेची केली होती निर्मिती
‘अटॅक’ चा निर्माता आणि प्रमुख अभिनेता जॉन अब्राहम पुढे म्हणाला की, “मी या चित्रपटासाठी १ रुपया देखील मानधन म्हणून घेतलेले नाहीये. किंबहुना काहीही न घेता मी त्यात माझा पैसा ओतला आहे. कारण ‘इट्स माय बेबी’. एखाद्या लहान मुलाला सांभाळतात तसा मी हा प्रोजेक्ट हाताळला आहे. तसेच पैसा म्हणजे सर्वकाही नाही. म्हणूनच मी तुम्हाला कधी पान मसाला किंवा तत्सम उत्पादनांची जाहिरात करताना दिसणार नाही.” जॉन अब्राहमने काही वर्षांपूर्वी ‘सविता दामोदर परांजपे’ हा मराठी चित्रपट निर्मित केला होता. अजूनही मराठीत काही करीत आहे का यावर सांगताना तो बोलला की, “तुम्हाला माहीतच असेल की मी नेहमी चांगल्या कलाकृतींना पाठिंबा देत असतो. ‘सविता दामोदर परांजपे’ त्यातीलच एक. आम्ही एका चांगल्या संहितेच्या शोधात आहोत आणि चांगलं कथानक मिळालं की नक्की पुढचा मराठी चित्रपट करणार. आणि हो मी निर्मिती करीत असलेला मल्याळम ‘माईक’ पूर्णत्वास आला असून लवकरच प्रदर्शित होईल.” जॉन ने ‘कॉमेडी’ चित्रपटांतूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केलंय. त्या संदर्भात विचारले असता तो म्हणाला की, “‘कॉमेडी’ करणे सर्वात कठीण गोष्ट. लॉकडाऊन मध्ये मी माझ्या स्टाफसोबत ‘गरम मसाला’ पुन्हा पहिला आणि खूप हसलो आणि इमोशनल झालो. लगेच मी अक्षय ला फोन करून सांगितले की मी तुझ्यासोबत काम करण्यास तरसतो आहे त्यावर तो म्हणाला, ‘मग बनवून टाक गरम मसाला २’ (हसतो). अक्षय खूप गमत्या आणि गोड माणूस आहे. मलादेखील कॉमेडी चित्रपट करायचा आहे. परंतु तो ‘किंग्समन’ प्रमाणे ॲक्शन-कॉमेडी असेल.”
पठाणमध्ये दिसणार शाहरुखसोबत
जॉन अब्राहम शाहरुख खान बरोबर ‘पठाण’ मध्ये दिसणार आहे. त्याबद्दल छेडले असता तो म्हणाला, “मी ‘पठाण’ बद्दल आत्ता काही बोलणार नाही. खरंतर कोरोना महामारीमुळे त्याचे ‘शेड्युल’ पुढे ढकलले गेलेय आणि लवकरच मी स्पेन ला शूट साठी जाणार आहे. शाहरुख बद्दल सांगायचं झालं तर ती एक अतिशय गोड व्यक्ती आहे आणि कामाप्रती त्याची असलेली निष्ठा प्रेरणादायी आहे. आणि हो, ‘पठाण’ मधील त्याचे काम बघून तुम्ही नक्कीच अवाक व्हाल.”
हेही वाचा -रणधीर कपूरना स्मृतिभ्रंश? जाणून घ्या काय आहे नेमके प्रकरण..