मुंबई - अलिकडच्या काळात सोनू सूद सिनेमांसाठी कमी आणि समाजकार्यांसाठी जास्त चर्चेत आहे. कोरोना कालखंडात सुरू झालेले त्याचे समाजकार्य आता खूप जोमात सुरू आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी तो जास्त कार्य करीत असतो आणि शिक्षण क्षेत्रात तो बऱ्याच अभिनव योजना राबवत असतो जेणेकरून गरजू, आर्थिकदृष्ट्या गरीब आणि वंचित वर्गातील लोकांना, खासकरून तरुणाईला, मार्गदर्शन आणि आर्थिक मदत मिळेल. आता सोनू सूदने वंचित तरुणाईची स्वप्नपूर्ती करण्याचे योजले आहे. सोनू सूद चॅरिटी फाऊंडेशन (SCF) ने डिव्हाईन इंडिया युथ असोसिएशन (DIYA) आणि सरत चंद्र अकादमी यांच्या सहकार्याने २०२३-२४ या कालावधीसाठी 'संभवम' उपक्रम सुरू करण्याचे घाटले असून तो शिक्षण क्षेत्रात काम करणार आहे.
आपल्या देशामध्ये सरकारी नोकरीला खूप महत्त्व दिले जाते आणि बहुतांश तरुणाई त्यासाठी शासकीय परीक्षांचा अभ्यास करताना दिसते. परंतु बऱ्याच परीक्षा कठीण असून त्यांना समर्थपणे तोंड देण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते आणि बऱ्याचदा ती महागडी असते. सामान्य जनता खर्चिक क्लासेस अटेंड करू शकत नाही. ज्यांना परवडत नाही त्यांना संभवम तर्फे नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी विनामूल्य ऑनलाइन आयएएस (IAS) कोचिंग मिळणार आहे. हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम गरीब, आर्थिकदृष्ट्या वंचित असणाऱ्यांसाठी असून तरुणाईने लाभ घ्यावा असे त्याने आवर्जून सांगितले आहे
सोनू सूदने अभिनय क्षेत्र व समाजकार्य क्षेत्र याचा उत्तम समन्वय साधला आहे. गरजूंना मदत करण्याच्या त्याच्या अथक प्रयत्नांमुळे केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही त्याचाबद्दलचा आदर वाढला आहे. गरजू जनतेचा 'मसिहा' ही अनोखी पदवी सोनू सूद ला दिली गेली आहे यावरून त्याच्या समाजकार्याच्या व्याप्तीची कल्पना येते. एससीएफ (SCF) म्हणजेच सूद चॅरिटी फाऊंडेशन ने गरजूंना मदत, कामगारांचे ऐटलरलिफ्ट, आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास आदी क्षेत्रात सातत्याने काम करीत समाजासाठी असंख्य कामे केलेली आहेत.