मुंबई - Elvish yadav :'बिग बॉस OTT 2' विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादव सापाचे विष पुरवणे आणि रेव्ह पार्टी आयोजित केल्याप्रकरणी त्याची काल रात्री चौकशी झाली. एल्विशची सेक्टर-20 पोलीस ठाण्यात सुमारे 3 तास चौकशी करण्यात आली. मीडियापासून वाचण्यासाठी एल्विश गुपचूप पोलीस ठाणे गाठले होते. त्याची चौकशी डीसीपी, एसीपी स्तरावरील अधिकाऱ्यांनी केली आहे. डीसीपी नोएडा हरिश्चंद्र यांनी सांगितले की, एल्विशला पुन्हा चौकशीसाठी नोटीस देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी पुढं सांगितलं की, नोएडा पोलीस आरोपी राहुल आणि एल्विश यांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी करू शकतात.
सापांची वैद्यकीय तपासणी : नोएडा पोलिसांना बुधवारी अटक केलेल्या 5 आरोपींना पोलीस कोठडी मिळू शकते. दरम्यान वनविभागानं सापांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं होतं. वैद्यकीय चाचणीत 5 नागांच्या विष ग्रंथी काढण्यात आल्याचं समोर आलं आहे. उर्वरित 4 साप विषारी नव्हते. कोणत्याही सापाची विष ग्रंथी काढून टाकणे क्रूरतेच्या श्रेणीत येते, त्यामुळं आरोपींना 7 वर्षांपर्यंत शिक्षा होईल. न्यायालयाच्या परवानगीनंतर सापांना जंगलात सोडण्यात आलं आहे.
राहुलचा ऑडिओ आला समोर : या संपूर्ण प्रकरणात एल्विशननं स्वत:ला निर्दोष घोषीत केलं आहे. त्यानं सांगितल्यानुसार त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये एल्विशचं नाव पुढं आलं आहे. ऑडिओमध्ये, अटक आरोपी राहुल यादवनं पीएफए (मेनका गांधींची संघटना पीपल्स फॉर अॅनिमल्स) सदस्याला सांगितलं की त्यानं हे ड्रग्ज एल्विशच्या पार्टीला पोहोचवलं होतं.