नवी दिल्ली :पंजाबी गायक आणि प्रसिद्ध रॅपर हनी सिंगला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सध्या कॅनडामध्ये असलेल्या गँगस्टर गोल्डी ब्रारने हनी सिंग याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे. हनी सिंगने याबाबत दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे तक्रार केली असून स्वत:सह संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षेची विनंती केली आहे.
धमकीची व्हाॅईस नोट पोलिसांना दिली : कॅनडामध्ये असलेल्या गोल्डी ब्रार या गुंडाच्या नावाने फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे हनी सिंगने सांगितले. त्याने धमकीची व्हॉईस नोटही पोलिसांना दिल्याचे सांगण्यात येत आहे. हनी सिंगच्या वक्तव्याची पडताळणी करण्यासोबतच दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल कॉलची संपूर्ण माहिती गोळा करत आहे. मीडियाशी बोलताना हनी सिंगने सांगितले की, मला सतत धमकीचे कॉल्स आणि व्हॉईस मेसेज येत आहेत. हे कॉल परदेशी क्रमांकावरून आले आहेत. तो म्हणाला की, 'मृत्यूला कोण घाबरत नाही. मला अशी धमकी पहिल्यांदाच मिळाली आहे. मला जनतेने नेहमीच प्रेम दिले आहे'.