मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा सध्या त्यांच्या लग्नामुळे खूप चर्चेत आहेत. बातमीनुसार, दोघेही 6 फेब्रुवारी 2023 रोजी लग्न करणार आहेत. लग्नाशी संबंधित कार्यक्रम सुरू झाले आहेत. नुकताच कियारा अडवाणीचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये ती तिच्या कुटुंबासोबत जैसलमेर विमानतळाबाहेर पडताना दिसली होती. तिच्या सोबत ड्रेस डिझायनर मनिष मल्होत्राही होता. विवाहपूर्व विधी ४ व ५ फेब्रुवारीला होणार आहेत. दरम्यान विवाह सोहळ्यासाठी सेलेब्रिटी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
जैसलमेर विमानतळाबाहेर आलिशान गाड्यांचा ताफा थांबला आहे. या सर्व गाड्या सिद्धार्थ आणि कियारा अडवणीच्या लग्नातील पाहुण्यांसाठी आहेत. आता एक एक करुन पाहुणे येत असून विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी संयोजकांनी व्यवस्था केली आहे. सुमारे १२५ निमंत्रीत पाहुणे यात सहभागी होणार अशी माहिती आहे.
अभिषेक बच्चन पत्नी व मुलीसह विमानतळावर स्पॉट - नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चन त्याच्या कुटुंबासह विमानतळावर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत त्यांची मुलगी आराध्या बच्चनही दिसत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.