मुंबई - 'शेरशाह' चित्रपटाची गाजलेली जोडी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसमध्ये 7 फेब्रुवारी (मंगळवार) विवाह झाला. त्यानंतर लव्हबर्ड्सने त्यांच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले. या छायाचित्रांमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली होती. लग्नाच्या एका दिवसानंतर, सिद्धार्थ-कियारा पती-पत्नीच्या रुपात जैसलमेर विमानतळावर झळकले. जैसलमेर येथून ही जोडी दिल्लीला पोहोचली. दिल्ली विमानतळाबाहेर पापाराझींनी त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सिद्धार्थ आणि कियारा फोटोग्राफर्सना सामोरे गेले. त्यानंतर उपस्थित पापाराझींना मिठाईचे वाटपही केले. सर्व पापाराझींना उत्तम स्वादिष्ठ मिठाईचे वाटप सिद्धार्थ आणि कियाराने स्वतःच्या हाताने केले. यावेळी नवविवाहितांनी सर्वांचे मनापासून आभारही मानले.
सिद्धार्थच्या घरी जोडप्याचे जोरदार स्वागत - सिद्धार्थ राहात असलेल्या बिल्डिंगला रोशनाईने सजवण्यात आले होते. सिद्धार्थचे कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे मित्र नवविवाहित जोडीच्या स्वागतासाठी उभे होते. जोरदार ढोल ताशाच्या गजरात सिद्धार्थ आणि कियाराचे स्वागत करण्यात आले. यावेळी मित्रांसह सिद्धार्थ आणि कियारानेही जोरदार डान्स करत सर्वांचा उत्साह वाढवला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पहिल्यांदा सिद्धार्थ आणि कियारा अडवाणी याची कार घराजवळ येताना दिसते. त्यानंतर पहिल्यांदा सिद्धार्थ उतरतो व त्याला मित्र रिसिव्ह करतात. पाठोपाठ कियारा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये उतरते तेव्हा ढोल नगाऱ्याचा आवाज वाढू लागतो आणि नंतर एक जल्लोष झालेला दिसतो.