मुंबई - शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्रानं नुकतंच केलेलं ट्विट मनोरंजन जगतात खळबळ उडवून देणारं ठरलंय. 'आम्ही विभक्त झालो आहोत आणि या खडतर काळामध्ये आम्हाला वेळ द्यावा ही नम्र विनंती...', असं त्यानं या लेटेस्ट ट्विटमध्ये म्हटलंय. या ट्विटचा अर्थ वरवर पाहता त्याच्यात आणि त्याची पत्नी शिल्पा शेट्टीमध्ये बिनसलंय आणि ते वेगळे झालेत असं वाटतं. पण हे ट्विट केल्यानंतर युजर्सनी त्याच्या कमेंट सेक्शनवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पाहता हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं वाटतंय. कारण राज कुंद्राचा 'UT69' हा चित्रपट ३ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याच्या प्रमोशनचाच हा एक भाग असल्यासारखं वाटतंय.
दोन दिवसापूर्वी राज कुंद्राच्या 'UT69' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. हा चित्रपट म्हणजे राज कुंद्राला पोर्न चित्रपट बनवल्याच्या आरोपाखाली आर्थर रोड तुरुंगात घालवलेल्या दिवसांचे वास्तव दर्शन आहे. हा काळ त्याच्यासाठी खूप खडतर राहिला होता. या चित्रपटात त्याच्या आयुष्यातील हा कठीण काळ दाखवण्यात आला असून यातील प्रसंग सत्य घटनेवर आधारित आहे.
राज कुंद्राच्या आयुष्यात सगळं काही आलबेल असताना त्याच्यावर पोर्न व्हिडिओ बनवत असल्याचा आरोप झाला. पोलिसांचा ससेमिरा त्याच्या पाठीशी लागला आणि त्याचं जगणंच बदलून गेलं. जवळपास दोन महिने सतत त्याच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या जात होत्या. या काळात शिल्पा शेट्टी त्याच्या पाठीशी ठामपणे उभी होती. तो जेव्हा तुरुंगातून जामिनावर मुक्त झाला तेव्हापासून त्यानं आपला सार्वजनिक वावर कमी केला. तो पत्नी आणि मुलं सोबत असतानाही आपला चेहरा झाकून फिरत असे. त्याच्या घरी गणेश उत्सवात पापाराझींनी मोठी गर्दी केली होती. तरीही त्यानं आपला चेहरा कुणालाही दिसणार नाही याची काळजी घेतली होती. दोन दिवसापूर्वी तो विमानतळावर पहिल्यांदाच बिन मास्कचा दिसला होता. त्यावेळी त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. आता दोन दिवसानंतर स्पष्ट होतंय की त्याच्या या उघड दिसण्याचा, आज विभक्त होत असल्याच्या ट्विटचा संबंध त्याच्या 'UT69' चित्रपटाच्या प्रमोशनचाच भाग आहे.