मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांचे प्रोडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंटने त्यांच्या आगामी 'जवान' चित्रपटामधील व्हिडिओ क्लिप चोरी झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंटचे मुख्य अधिकारी प्रदीप निमाणी यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात १० ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. या सर्व प्रकाराने कॉपीराईडचे उल्लंघन झाले आहे. चित्रीकरणादरम्यान रेड चिलीज एंटरटेनमेंटने शूटिंगच्या ठिकाणी मोबाईल फोन आणि रेकॉर्डिंग डिव्हाइसेस आणण्यास मनाई केली होती. असे असताना देखील अज्ञात व्यक्तीने व्हिडिओ क्लिप चोरी करून या क्लिप सोशल मीडियावर प्रसारित केल्या आहेत.
'जवान' चित्रपटाची व्हिडिओ क्लिप चोरी : रेड चिलीज इंटरटेनमेंटच्या म्हणण्यानुसार हा सगळा प्रकार कंपनी तसेच चित्रपटाचे नुकसान करण्याच्या उद्देशाने केला गेला आहे. याबद्दल तक्रारदारीमध्ये देखील दाखल करण्यात आले आहे. रेड चिलीज इंटरटेनमेंटनुसार पाच ट्विटर हँडलवर 'जवान' चित्रपटाच्या क्लिप शेअर केल्या गेल्या आहेत. याप्रकारावर कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली आहे. सांताक्रुज पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ३७९ आणि ४३ बी माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत अज्ञात इसमा विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सांताक्रुज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांनी दिली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.