मुंबई- 'द फॅमिली मॅन' च्या गाजलेल्या यशानंतर, राज आणि डीके यांनी त्यांच्या 'फर्जी' या मालिकेद्वारे आणखी एक पराक्रम केला आहे. ओरमॅक्स मीडियाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, 'फर्जी' या वेब सिरीजला आतापर्यंतची सर्वाधिक पाहिली जाणारी भारतीय मालिका घोषित करण्यात आली आहे. शाहिद कपूर आणि विजय सेतुपती स्टारर 'फर्जी' ने 37.1 दशलक्ष दर्शकांची नोंद केली आहे
त्याच्या इंस्टा-फॅमिलीसह बातम्या शेअर करताने शाहिदने डेटा आणि तपशील उघड करणारी एक पोस्ट शेअर केली. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, 'फर्जी फीवर...तुमचे खूप खूप आभार.' राज आणि डीके यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर, 'आपल्या सर्वांचे आभार... सर्वांच्या प्रेमासाठी!! अशी पोस्ट शेअर केली आहे.' 'फर्जी' मध्ये चतुरसत्र अभिनेते शाहिद कपूर, विजय सेतुपती, राशि खन्ना, के के मेनन, भुवन अरोरा, रेजिना कॅसांड्रा आणि अमोल पालेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
या मालिकेची कथा कॉन कलाकार सनी (शाहिदने साकारलेली) च्या आयुष्याभोवती फिरते, जो एक परिपूर्ण कॉन तयार करत असताना गुन्हागेरीकडे वळतो. त्याचे प्रत्येक पाऊल धोक्याच्या दिशेने पडत जाते. त्याचवेळी अशा गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावलेल्या टास्क फोर्स अधिकाऱ्याशी (विजय सेतुपतीने भूमिका बजावली आहे) त्याचा सामना होतो.