मुंबई - 'जवान' चित्रपटातील 'छलेया तेरी ओर' या नव्या गाण्याची प्रतीक्षा शाहरुखचे चाहते करत होते. अखेर निर्मात्यांनी हे गाणे रिलीज केले असून पाहाता क्षणीच चाहते गाण्याच्या प्रेमात पडले आहेत. हा एक मंत्रमुग्ध करणारा रोमँटिक ट्रॅक आहे. गाण्याचे सुंदर बोल आणि त्यावर ताल धरायला लावणारे संगीत आपल्याला मोहून टाकण्यात संगीतकार यशस्वी झाला आहे.
शाहरुख खानने त्याच्या आगामी अॅक्शन-पॅक थ्रिलर, 'जवान' मधील रोमँटिक 'छलेया' गाण्याचे लॉन्चिंग केले. त्याने हे गाणे सोशल मीडियावर शेअर केले. उत्कठ भावना आणि सुंदर ताल यांचा मिलाफ असलेले हे गीत तीन भाषांमध्ये रिलीज झाले आहे. या गाण्यात शाहरुख खान आणि साऊथ स्टार नयनताराची जबरदस्त ऑनस्क्रिन केमेस्ट्री पाहायला मिळत आहे.
गाण्याच्या रिलीजनंतर चाहत्यांकडून त्वरित प्रेमाचा वर्षाव सुरू झाला. हार्ट इमोजी आणि अग्नि चिन्हांसह कमेंट सेक्शन भरुन गेले आहे. शाहरुख खानचे पर्व पुन्हा सुरू झाले असल्याचा अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
'जवान' मधील 'छेलया...' गाण्याचे बोल कुमारने लिहिले आहेत आणि अनिरुद्ध रविचंदरने संगीतबद्ध केलेले हे गाणे अरिजीत सिंग आणि शिल्पा राव यांनी गायले आहे. या गाण्याची कोरिओग्राफी फराह खानने चतुराईने हाताळलेली आहे. अलिकडेच शाहरुखने चाहत्यांशी संवाद साधताना या गाण्याचा उल्लेख केला होता. 'जवान' चित्रपटातील 'छलेया' हे आपले सर्वात आवडते गाणे असल्याचे त्याने म्हटले होते.
अॅटली कुमार दिग्दर्शित 'जवान' या बहुप्रतिक्षित चित्रपटाची उत्कंठा दिवसेंदिवस वाढत चालली आहे चित्रपटातील दोन गाणी रिलीज झाली असून दोन्हीलाही प्रेक्षकांनी उत्साहाने प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाची क्रेझ संपूर्ण भारतात पाहायला मिळत आहे. यापूर्वी त्याचा 'पठाण' चित्रपट रिलीज झाला होता. त्याला देशभर प्रतिसाद मिळाला असला तरी कुठेतरी अजूनही दक्षिण भारतात शाहरुख खान बद्दलचे मोठे आकर्षण नाही. आता 'जवान' चित्रपटातून दिग्दर्शक अॅटली, विजय सेतुपती आणि नयनतारासारख्या मोठे नाव असलेल्या सेलेब्रिटींशी तो जोडला गेला असल्यामुळे त्याची ही कसरही भरुन निघू शकते.