मुंबई :बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान हा त्याच्या आगामी 'टायगर ३' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. 'टायगर ३' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान आता सलमान खानच्या ' टायगर ३' चित्रपटामध्ये शाहरुख खान हा कॅमिओद्वारे प्रेक्षकांच्या भेटाला येणार आहे. यापूर्वी शाहरुख आणि सलमान खानची जोडी ब्लॉकबस्टर चित्रपट पठाणमध्ये दिसली होती. आता पुन्हा एकदा आपल्याला ही जोडी एकत्र दिसणार आहे. पठाण या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर एक हजार कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. पठाण चित्रपटामधील सलमान खानच्या कॅमिओने चित्रपटगृहांमध्ये खळबळ उडवून दिली होती. शाहरुख आणि सलमान खानला एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. टायगर हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
'जवान'सोबत 'टायगर 3' चा टीझर रिलीज होणार : शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी अॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'जवान'मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबरला रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे. सलमान खानच्या 'टायगर ३' चित्रपटाचा टीझर 'जवान' सोबत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार, असल्याचे बोलले जात आहे. आता शाहरुखसोबतच सलमान खानचे चाहतेही 'जवान' चित्रपटाची वाट पाहत आहेत. हा चित्रपट पठाण चित्रपटाप्रमाणेच बॉक्स ऑफिसवर कमाई करेल असा अंदाज वर्तविला जात आहे, कारण या चित्रपटाच्या टिझरला प्रेक्षकाद्वारे खूप पसंत केले गेले होते.