मुंबई :सनी देओलच्या 'गदर २' नंतर आता शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट धमाका करण्यासाठी बॉक्स ऑफिसवर येत आहे. हा चित्रपट आता थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान सध्या बॉक्स ऑफिसवर 'गदर २'ने धुमाकूळ घातला आहे. आता २५ ऑगस्ट रोजी कॉमेडी-ड्रामा चित्रपट 'ड्रीम गर्ल २' बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. यानंतर शाहरुख खानचा 'जवान' रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान आता सरकारने ८ ते १० सप्टेंबरपर्यंत सरकारी सुट्टी जाहीर केली आहे. चित्रपटगृहे बंद राहणार आहेत. शाहरुख खानचे चाहते या चित्रपटाबाबत खूप उत्सूक आहेत, मात्र सरकारी सुट्टीमुळे शाहरुखच्या चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहेत.
केजरीवाल यांनी ३ दिवसांची सुट्टी का जाहीर केली :राजधानी दिल्लीत ८ ते १० सप्टेंबर दरम्यान जी २० ( G20) परिषद होणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ८ ते १० सप्टेंबरपर्यंत सरकारी आणि खासगी शाळा आणि कार्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान केजरीवाल यांच्या या तीन दिवसांच्या सुट्टीच्या घोषणेमुळे शाहरुख खानचे दिल्लीतील चाहते नाराज झाले आहेत. 'जवान' ७ सप्टेंबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. मुंबईनंतर दिल्लीत शाहरुखचे चित्रपट सर्वाधिक चालतात. अनेकदा सुरुवातीच्या आठवड्यात सर्वाधिक कमाई दिल्लीत होते. यादरम्यान दिल्लीतील चित्रपटगृहे बंद राहिल्यास 'जवान'चे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जर फक्त नवी दिल्लीतील चित्रपटगृहे बंद राहिली तर कमी नुकसान अपेक्षित आहे, कारण प्रेक्षक दिल्लीतील इतर चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहू शकेल.