मुंबई- सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, लवकरच झोया अख्तरच्या द आर्चीजमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिने महाराष्ट्रातील अलिबागमधील थळ गावात १२.९१ कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, नोंदणी फॉर्ममध्ये सुहाना खानशेतकरी असा उल्लेख करण्यात आलाय.
सुहाना खानने शेतकरी म्हणून खरेदी केली शेत जमीन - १ जून रोजी नोंदवलेल्या व्यवहारानुसार, २२१८ चौरस फूट बांधकाम असलेली १.५ एकर शेतजमीन खरेदी करण्यात आली आहे. IndexTap.com द्वारे प्रवेश केलेल्या आणि शेअर केलेल्या नोंदणी दस्तऐवजांमध्ये असे दिसून आले आहे की सुहानाने ७७.४६ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. ही जमीन अंजली, रेखा आणि प्रिया खोत या तीन बहिणींकडून विकत घेण्यात आली आहे. या तीन बहिणींना ही जमीन त्यांच्या पालकांकडून वारसाहक्काने मिळाली होती.
शाहरुखची अलिबागमध्ये आहे प्रॉपर्टी- सुहानाने खरेदी केलेली ही मालमत्ता देजा वू फार्म प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर नोंदणीकृत आहे, ज्यांच्या संचालकांमध्ये शाहरुख खानची सासू सविता छिब्बर आणि शाहरुखची मेव्हणी नमिता छिब्बर यांचा समावेश आहे. थळ गावापासून अलिबाग शहर कारने १२ मिनिटांच्या अंतरावर आहे. मिळालेल्या बातमीनुसार शाहरुख खानकडे थळमध्ये हेलिपॅड आणि पूल असलेले समुद्रकिनारी घर आहे. बंगल्यावर किंग खानने 52 वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला होता.
बॉलिवूड सेलेब्रीटीजची अलिबागमध्ये फार्म हाऊसेस- दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली आणि उद्योगपती गौतम सिंघानिया यांच्यासह मुंबईतील अनेक सेलिब्रिटींची अलिबागमध्ये सुट्टीसाठी घरे व फार्महाऊसेस आहेत. रो-रो आणि स्पीड बोटींनी मुंबईला अलिबाग जोडल्यानंतर अलिबागची कनेक्टिव्हिटी चांगली झालीय. शिवडी ते न्हावा शेवा यांना जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक सागरी सेतूमुळे अलिबागची रस्त्याची कनेक्टिव्हिटी आणखी वाढवली जाईल, जे वर्षाच्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.