मुंबई - Shah Rukh khan visits Vaishno Devi :अभिनेता शाहरुख खानसाठी 2023 हे वर्ष उत्तम ठरले आहे. 'पठाण' आणि 'जवान' हे दोन चित्रपट ब्लॉकबस्टर झाल्यानंतर 'किंग खान'चा दबदबा हा जगात पाहायला मिळतोय. 'पठाण' आणि 'जवान' रिलीज होण्यापूर्वी शाहरुखनं वैष्णोदेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे. आता शाहरुख खान पुन्हा एकदा आपल्या आगामी 'डंकी' चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करण्यासाठी वैष्णोदेवीच्या चरणी पोहोचला. शाहरुख खानचे वैष्णोदेवी मंदिरातील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 'किंग खान' हा काल रात्री 12.30 वाजता कटरा येथे दिसला.
किंग खान वैष्णोदेवीच्या मंदिरात पोहोचला : शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी काही बॉडीगार्डसह दिसली. यावेळी त्यांच्यासोबत 'किंग खान' देखील होता. सरकारनं दिलेल्या 'वाय प्लस' श्रेणीच्या सुरक्षेच्या घेऱ्यात शाहरुखनं वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख खाननं काळं लेदर जॅकेट घातलं आहे. त्यानं आपलं डोकं जॅकेटच्या टोपीनं झाकलेलं आहे. याआधी 'किंग खान' हा 'पठाण' आणि 'जवान'च्या रिलीजपूर्वी माता राणीच्या दर्शनासाठी गेला होता. दरम्यान शाहरुखनं 'डंकी' या आगामी चित्रपटाच्या रिलीजपूर्वी माता राणीला आशीर्वाद मागितला आहे. 'पठाण' 25 जानेवारी 2023ला आणि 'जवान' 7 सप्टेंबर 2023 ला रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली.