मुंबई - Jawan trailer at Burj Khalifa सुपरस्टार शाहरुख खानने गुरुवारी दुबईच्या बुर्ज खलिफा या आयकॉनिक इमारतीवर 'जवान'चा ट्रेलर लॉन्च करुन सर्वांचे डोळे दीपवले. या इमारतीवर त्याने 'जवान'चा तीन मिनीटांचा व्हिडिओ लॉन्च केला आणि खूप काळाची लोकांची प्रतीक्षा संपवली. चेन्नईत पार पडलेल्या भव्य प्री लॉन्चिंग कार्यक्रमानंतर शाहरुखने दुबईतील आयकॉनिक बुर्ज खलिफा इमारतीवर ट्रेलर लाँच केला आहे.
या ट्रेलर लॉन्च प्रसंगी शाहरुख खानने 'जिंदा बंदा' गाण्यावर ताल धरला. या सोहळ्यात 'चलेया' गाण्याचे अरबी व्हर्जनही लॉन्च करण्यात आले. या कार्यक्रमात शाहरुख खानने चाहत्यांशी संवाद साधताना आपली आयकॉनिक पोझही दिली. 'जवान' चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे भरपूर पॅकेज असल्याचे त्याने सांगितले.
'जवान' चित्रपटात सहा वेगवेगळ्या लूकमध्ये शाहरुख खान दिसला आहे. यात एका लूकमध्ये तो टक्कल केलेला दिसत आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, ही पहिली आणि अखेरची वेळ असेल. त्याचा टकलू अवतार पाहण्यासाठी चित्रपट पाहण्याचे आवाहनही त्याने केले.
शाहरुख खान म्हणाला, 'या चित्रपटात माझे टक्कल देखील आहे. जसा की मी नाही, आणि मला तसे बनायचेही नाही. टक्कल करण्याची ही माझी पहिली आणि अखेरची वेळ असेल. तुमच्यासाठी मी टक्कलू पण झालोय. कुणाची तरी इज्जत राखण्यासाठी तरी जा. काय माहिती मी पुन्हा तुम्हाला असा टक्कलू दिसेल की नाही.' ( असे तो हिंदीत म्हणाला. )
दरम्यान जवान चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लहर निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोणताही वाद होणार नाही याची काळजी घेत या चित्रपटाची निर्मिती झाल्याचे ट्रेलरवरुन स्पष्ट दिसत आहे. उत्तम संवाद, जबरदस्त अॅक्शन सीन्स, दमदार संगीत आणि नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण अशी तगडी स्टार कास्ट असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.