मुंबई - King Khans disclosure : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट सध्या चर्चेत आहे. त्यापूर्वी त्याच्या 'पठाण' चित्रपटाने पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरकडे आकर्षित केलं होतं. मात्र त्यापूर्वी अगदी २०१९ पासून तो रुपेरी पडद्यापासून दूर होता. चार वर्ष तो गायब होता आणि पुन्हा तो कसा परतला याचा खुलासा किंग खाननं केला आहे. त्यानं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जवान' चित्रपटाच्या सक्सेस कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेत त्याच्या गायब होण्याबद्दल सांगितलं. किंग खानने सांगितलं की, 'पठाण'च्या सेटवर पुनरागमन करण्यासाठी त्याचा मुलगा आर्यन खाननं महत्त्वाची भूमिका बजावली होती.
शाहरुख म्हणाला, 'इतकी वर्ष काम न केल्यानं मीही खूप नर्व्हस झालो होतो. माझ्या मोठ्या मुलानं सांगितलं की, 'आम्ही जेव्हा वाढत होतो तेव्हा आम्हाला माहिती होतं की हवेत किती स्टारडम आहे, कारण तुमचे सिनेमा मोठे हिट होते. मुलगी ( सुहाना खान ) म्हणाली की हो हे मला हे माहितीय. परंतु या छोट्याला ( अबराम खान ) माहितीय की तुम्ही स्टार आहात. परंतु त्यानं हवेतला स्टारडम पाहिला किंवा अनुभवलेला नाही. त्यामुळं पुढच्या पाच चित्रपटात खूप मेहनत करा, त्याला ते हवेत जाणवलं पाहिजे, आम्ही तुमच्यावर प्रेम करतो आणि आदरही करतो.'
आपले चित्रपट यशस्वी व्हावेत यासाठी गेली २९ वर्षे कठोर मेहनत करत असल्याचंही शाहरुख म्हणाला, त्याचा आगामी राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'डंकी' हा चित्रपट या वर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होणार असल्याचंही तो म्हणाला.
किंग खानने वर्षाची सुरुवात धमाकेदार पद्धतीनं केली होती. 'पठाण' चित्रपट देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्वात मोठा हिंदी चित्रपट बनला आणि तब्बल 543.05 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये आलेल्या 'जवान' या चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या नऊ दिवसांत 400 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्याचा आगामी 'डंकी' चित्रपट या डिसेंबरमध्ये थिएटरमध्ये रिलीज होईल तेव्हा आणखी मोठा धमाका होईल अशा शाहरुखसह चाहत्यांनाही वाटतेय.