मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानला अमेरिकेत शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे. दिुखापतीनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्या नाकावर शस्त्रक्रिया करण्यात आली. किंग खान लॉस एंजेलिसमध्ये एका अज्ञात प्रोजेक्टसाठी शूटिंग करत असताना ही दुर्दैवी घटना घडली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर शाहरुख खान भारतात परतला आहे.
शाहरुख खान अपघातातून बचावला - शाहरुखचे चाहते त्याच्या आगामी जवान चित्रपटाच्या ट्रेलर लाँचची आतुरतेने वाट पाहत असताना, अमेरिकेत तो अज्ञात चित्रपटासाठी शूट करत होता. अनेक वेबलॉइड्सवर ही बातमी झळकली आहे. हाती आलेल्या बातमीनुसार लॉस एंजेलिसमध्ये एसआरके एका किरकोळ ऑन-सेट अपघातातून बचावला. अपघातादरम्यान शाहरुखच्या नाकाला दुखापत झाली होती आणि त्यासाठी किरकोळ शस्त्रक्रिया करावी लागली होती. आता शाहरुख बरा होण्याच्या मार्गावर असल्यामुळे एसआरकेच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
शस्त्रक्रियेनंतर घरी परतला शाहरुख - एसकेआरला सेटवर अपघात कसा झाला यासंबंधीचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. त्याच्या नाकाला दुखापत झाल्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर शाहरुखच्या टीमला डॉक्टरांनी सांगितले की काळजी करण्यासारखे काही नाही. किरकोळ शस्त्रक्रियेनंतर, शाहरुख खान त्याच्या नाकावर पट्टी बांधलेला दिसला. खानच्या टीमने त्याच्या प्रकृतीबद्दल अधिकृत निवेदन जाहीर केलेले नसले तरी तो मुंबईत घरी परतला असून आता तो बरा आहे.
जवानचा ट्रेलर मिशन इम्पॉसिबलसोबत- दरम्यान, शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित जवान ट्रेलर टॉम क्रूझच्या मिशन: इम्पॉसिबल डेड रेकनिंग पार्ट वनला जोडला जाईल. हा चित्रपट १२ जुलै रोजी भारतात रिलीज होत आहे. अटली कुमार दिग्दर्शित या चित्रपटात तमिळ सुपरस्टार नयनतारा आणि विजय सेठीपाठी देखील आहेत. जवान ७ सप्टेंबरला मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.