मुंबई- David Beckham on India tour : जगातील आजवरचा सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या डेव्हिड बेकहॅमसाठी शाहरुख खाननं मन्नत बंगल्यात खास पार्टीचं आयोजन केलं होतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत मन्नत बंगल्याच्या बाहेर एक आलिशान कार येऊन उभी राहते. कारच्या ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला डेव्हिड बेकहॅम बसल्याचं दिसतं.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी विश्वचषक 2023 उपांत्य फेरीच्या सामन्याच्यावेळी डेव्हिड बेकहॅम व्हीव्हीआयपी म्हणून वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होता. यावेळी मैदानावर तो सचिन तेंडूलकरसोबत सामनन्याचा आनंद घेताना दिसला. सामना संपल्यानंतर तो विराट कोहलीचं अभिनंदन करताना दिसला होता. या सामन्याच्या दरम्यान तो फिल्म इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांना भेटला. सर्वांनी त्याचं भारतात स्वागत केलं आणि त्याला आपल्या घरी येण्याचं आमंत्रणही दिलं होतं.
सामन्यानंतर बुधवारी रात्री अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांनी बेकहॅमसाठी एक पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी अनेक बॉलिवूड सेलेब्रिटींनी हजेरी लावली आणि डेव्हिड बेकहॅमची भेट घेतली. आदित्या ठाकरेंनेही आपल्या भावासोबत या पार्टीला हजरी लावली होती. याशिवाय अंबानी कुटुंबीयानंही त्याला भेटून 7 नंबर असलेली मुंबई इंडियन्सची जर्सी भेट म्हणून दिली. प्रतिष्ठित क्लब मँचेस्टर युनायटेडसाठी बेकहॅमने सात क्रमांकाची जर्सी परिधान करुन खेळत होता.
बेकहॅम हा युनिसेफचा सदिच्छा दूत म्हणून कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महिला आणि मुलींचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि क्रिकेटच्या माध्यमातून लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी युनिसेफसोबत भागीदारी केली आहे.