महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

SRK Birthday : मन्नत बाहेर दिवाळी : 'मी तुमच्या प्रेमाच्या स्वप्नात जगतो', म्हणत शाहरुखनं मानलं आभार - शाहरुख खान वाढदिवस

सुपरस्टार शाहरुख खानला 58 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या 'मन्नत' निवासस्थानाबाहेर जमलेल्या चाहत्यांच्या मोठ्या समुदायाला त्यानं अभिवादन केलं. 'मी तुमच्या प्रेमाच्या स्वप्नात जगतो', असं ट्विट करत त्यानं तमाम चाहत्यांचं आभार मानलं.

SRK Birthday
शाहरुख खान वाढदिवस

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 10:10 AM IST

मुंबई - सुपरस्टार शाहरुख खान आज आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसाचा उत्साह चाहत्यांमध्ये प्रचंड आहे. सालाबाद प्रमाणे चाहत्यांनी त्याच्या मन्नत या बंगल्याबाहेर वाढदिवसाच्या मध्यरात्री गर्दी केली होती. मुंबई आणि देशभरातून आलेला त्याच्या चाहत्यांचा अलोट जनसागर जमला होता. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी डोळ्यात प्राण साठवून उभ्या असलेल्या चाहत्यांना त्यानं नाराज केलं नाही. त्याच्या नेहमीच्या स्टाईलनं तो मन्नतच्या रेलींगवर उभा राहिला आणि चाहत्यांना अभिवादन केलं. त्याला पाहताच मन्नतच्या बाहेर जल्लोष साजरा झाला. फटाक्यांची आतिषबाजी झाली, केक कापले गेले, बॅनर- पोस्टर्स झळकले.

गुरुवारी पहाटे चाहत्यांना भेटल्यानंतर शाहरुखनं त्यांचं आभार मानण्यासाठी एक्सवर एक पोस्ट लिहिलीय. त्यानं लिहिलंय, 'तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं येता आणि मला मध्यरात्री शुभेच्छा देता हे खरंच अविश्वसनीय आहे. मी केवळ तुमचं थोडसं मनोरंजन करतो याहून आनंददायी काही नाही. मी तुमच्या प्रेमाच्या स्वप्नात जगतो. तुमचं मनोरंजन करण्याची संधी दिलीत त्याबद्दल धन्यावाद देतो. उद्या सकाळी भेटू...पडद्यावर आणि मागेही.'

'मन्नत' निवासस्थानाबाहेर जमलेल्या चाहत्यांच्या मोठ्या समुदायाला शाहरुखं अभिवादन केलं

किंग खानने देखील त्याच्या चाहत्यांसमोर आपली सिग्नेचर पोझ दिल्यानंतर मन्नत बंगल्या बाहेर अक्षरशः जल्लोष झाला, चाहत्यांनी दिवाळी साजरी केली. यावेळी शाहरुखनं कॅमफ्लाज ट्राउझर्ससह एक साधा काळा टी-शर्ट घातला होता. काळ्या टोपीत तो खूपच सुंदर दिसतो होता. सकाळपासूनच विविध शहरांतील स्टारस्स्ट्रक चाहत्यांनी आपल्या खास पद्धतीने शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी रांगा लावल्या होत्या. अनेकांनी मिठाई, टी-शर्ट आणि शाहरुखचे मोठे पोस्टर्सही सोबत आणले होते.

कामाच्या आघाडीवर, शाहरुख खान 'पठाण' आणि 'जवान' या दोन मोठ्या ब्लॉकबस्टर्सच्या यशावर स्वार झालाय. यावर्षी प्रदर्शित झालेले हे दोन चित्रपट शाहरुखला पुन्हा एकदा 'किंग खान' पदावर पुन्हा विराजमान करुन गेलेत. आता चाहत्यांच्या सगळ्या नजरा त्याच्या आगामी 'डंकी' चित्रपटावर आहेत. डिसेंबरमध्ये रिलीज होणाऱ्या या चित्रपटाची एक मोठी झलक आज शाहरुखच्या वाढदिवशी पाहायला मिळणार आहे. काही वेळातच 'डंकी'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details