महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Na Dho Mahanor passed away: मराठी मातीतला 'रानकवी' हरपला, म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ना. धो. महानोर यांना वाहिली श्रद्धांजली - Na Dho Mahanor

ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने मराठी साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात दुःखाचे वातावरण पसरले आहे. सर्जनशील, रसिक मनाला रानाशी मैत्र घडवून देणारा, शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची मांडणी करताना त्यांनी ग्रामीण जीवनाच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारा, साहित्याला मातीचा गंध देणारा 'रानकवी' हरपला अशा प्रतिक्रिया मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त केली आहे.

Na Dho Mahanor passed away
ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर

By

Published : Aug 3, 2023, 12:01 PM IST

मुंबई - मातीत रमणारा, निसर्गाची अनेक रुपे आपल्या शब्दांतून उलगडून दाखवणारा संवेदनशील रानकवी हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धो. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महानोर यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

'मराठी माती सर्जनशीलतेची खाण आहे. यात ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांनी आपल्या शब्द सामर्थ्याने निसर्गाची, राना- वनातील, पानाफुलांतील सौंदर्य अनेकविध रूपे रसिकांसमोर मांडली. ते प्रयोगशील शेतकरी होते. शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची मांडणी करताना त्यांनी ग्रामीण जीवनाच्या अनेक पैलूंवर आपल्या लेखनातून प्रकाश टाकला. शेतातून, साहित्यिक मंच ते विधानपरिषद असा त्यांचा प्रवास राहिला. या सगळ्याच ठिकाणी महानोर यांनी आपल्या संवेदनशील कवी मनाची अमीट छाप उमटवली आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांची उणीव निश्चितच भासत राहील. ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धो.महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली,' असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

रसिक मनाला रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला - ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने रसिक मनाला रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेणारा महान साहित्यिक आपण गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, ना. धों. महानोर यांनी कवितेला हिरवा शालू नेसवला. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. त्यांच्या कवितेत विविध गंध आहेत, विविध ध्वनी आहेत. ‘रानातल्या कविता’ या त्यांच्या कवितासंग्रहाने मराठी माणसावर गारूड केलं. लोकसाहित्यावर त्यांनी अलोट प्रेम केले. त्यांनी चित्रपटासाठी लिहिलेली गीते मनाचा ठाव घेणारी आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक थोर साहित्यिक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबियांना देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !

साहित्याला मातीचा गंध देणारा 'रानकवी' हरपला - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कवीवर्य ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कवीवर्य ना. धों. महानोर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी आहे. त्यांचे पवार कुटुंबियांशी खूप घनिष्ठ संबंध होते. मराठी साहित्याला मातीचा गंध देणारा 'रानकवी' हरपला, असेही अजित पवार म्हणाले.

ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर खऱ्या अर्थानं 'रानकवी' होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन, ग्रामीण संस्कृतीचं वैभव मराठी साहित्यात आणलं. त्यांच्या ‘रानातल्या कवितां'नी वाचकांना निसर्गाची सहल घडवली. मराठवाडी बोलीतल्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी' 'पळसखेडची गाणी' सारख्या लोकगीतांनी मराठी साहित्य समृद्ध केलं. कवयित्री बहिणाबाई, बालकवींचा वारसा पुढे नेत त्यांनी साहित्यक्षेत्रात अढळ स्थान निर्माण केलं. निसर्गकवी म्हणून वावरताना निसर्गाची काळजीही घेतली. पाणलोट पर्यावरण क्षेत्रातल्या कार्याबद्दल ते 'वनश्री' पुरस्काराने सन्मानित होते. राज्य शासनाच्या ‘कृषीभूषण’, केंद्र सरकारच्या 'पद्मश्री' पुरस्काराचे मानकरी ठरले होते. शेती आणि साहित्य क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करत असताना विधीमंडळात आमदार म्हणूनही प्रतिनिधीत्व केलं. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. पवार कुटुंबियांनी घनिष्ठ मित्र गमावला आहे. महानोर कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. ना. धों. महानोर साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो, ' अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कवीवर्य ना. धों. महानोर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आदरांजली वाहिली आहे.

हेही वाचा -

१.Manish Paul Birthday : मनीष पॉलच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी...

२.Guns & Gulaabs trailer out: राजकुमार राव, दुल्कर सलमानची मती गुंग करणारी गँगस्टर कॉमेडी

३.AR Rahman Shocked : एआर रहमानची उडाली भीतीने गाळण, फहाद फासिलचा अवतार पाहून बसला धक्का

ABOUT THE AUTHOR

...view details