मुंबई- मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत लीलया वावरणारा अभिनेता सौरभ गोखले नेहमी विविधांगी भूमिकांतून प्रेक्षकांच्या समोर आलाय. नेहमी भूमिकेचं वेगळेपण जपत त्याने सिनेमे केलेत. नाटकं, चित्रपट, जाहिराती या प्रांतात तो सातत्याने कामं करीत आलाय. आता सौरभ एका देशप्रेमी सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. नेहमीप्रमाणे तो या भूमिकेसाठीही प्रचंड मेहनत घेताना दिसतोय. सिनेविश्वात स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलेल्या सौरभ गोखले प्रेक्षकांना रिझवत आला आहे. त्यामुळेच 'फौजी’ या मराठी चित्रपटामध्ये एका जिगरबाज सैनिकाच्या ‘रफ अँड टफ’ भूमिकेत तो वेगळे रंग दर्शविण्यासाठी उत्सुक आहे.
या चित्रपटात सौरभ कमांडोच्या भूमिकेत असून तो एका निडर सैनिकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन घनशाम येडे यांनी केले असून चित्रपटाची निर्मितीही त्यांचीच आहे. घनशाम येडे यांनीच चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते या सर्वांची जबाबदारी उचलली आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांची या व्यवसायात एक स्पॉट बॉय म्हणून एंट्री झाली होती आणि त्यांचा स्पॉट बॉय ते निर्माता-दिग्दर्शक हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. मातृपितृ फिल्म्स् ची प्रस्तुती असलेल्या, ‘फौजी’ देशाचा प्राण, ‘आन बान शान’, या चित्रपटात अनेक थरारक दृश्ये दिसतील.
या भूमिकेबद्दल सौरभ गोखले म्हणाला की, 'मला नेहमीच चॅलेंजिंग भूमिका करायला आवडतात. ‘फौजी’ मध्ये मी सैनिकाची भूमिका साकारत असून मी आवश्यक ट्रेनिंगही घेतोय. अश्या भूमिका साकारताना अंगावर मूठभर मास चढते असे ऐकून होतो आणि ते आता प्रत्यक्ष अनुभवतो आहे. ही भूमिका साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक असली तरी आनंददायी देखील आहे.'
या सिनेमात सौरभ गोखले, प्राजक्ता गायकवाड, नागेश भोसले, शहाबाज खान, अरुण नलावडे, कल्याणी चौधरी, संजय खापरे, अश्विनी कासार, सुनील गोडबोले, हंसराज जगताप, सिद्धेश्वर झाडबुके, रोहित चव्हाण, विवेक चाबुकस्वार, जयंत सावरकर, सुहास गरगडे, विश्वजित बेलदार, संकेत तटकरी, घनशाम येडे यांच्या प्रमुख व महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘फौजी’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.