मुंबई- अभिनेता सतिश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांची अकरा वर्षांच्या चिमुरडी मुलगी वंशिका हिच्या डोईवरचे मायेचे छत हरवले आहे. वंशिका हिने गुरुवारी रात्री वडिलांसोबतचा एक थ्रोबॅक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. फोटोत वंशिकाने वडिलांच्या गळ्यात मायेची मिठी मारलेली दिसत आहे. वंशिकाने हा फोटो पोस्ट केल्यानंतर लगेचच चाहत्यांनी या फोटोवर मनापासून प्रतिक्रिया दिल्या. दिग्दर्शक शेखर कपूर यांनी फोटोवर हृदयाचे इमोजी पोस्ट केले. एकाने लिहिलं, 'स्टे स्ट्राँग गर्ल...', दुसर्याने लिहिले, 'तू फक्त आनंदाला पात्र आहेस बाळा, तुझ्या वडिलांना नेहमी अभिमान वाटू दे.'
सतीश कौशिक यांचे 8 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते एका मित्राच्या होळीच्या पार्टीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला गेले होते. त्यांच्या निधनाच्या एक दिवस आधी मुंबईत जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या होळीच्या सोहळ्याला अभिनेता सतिश कौशिक उपस्थित होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांचे चाहते आणि अनुयायांसह संपूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. सतिश यांनी 1985 मध्ये शशी कौशिक यांच्याशी लग्न केले. त्यांचा मुलगा शानू कौशिक 1996 मध्ये तो फक्त दोन वर्षांचा असताना मरण पावला. पुत्र शोकाने व्यथित झालेल्या कौशिक दांपत्याला 2012 मध्ये त्यांची मुलगी वंशिकाचा जन्म सरोगसीद्वारे झाला.